या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७३] व्यापाराच्या वाढीबरोबर नाण्याची गरज जास्त लागते व निरनिराळ्या देशांत त्या त्या देशाच्या राजसत्तेच्या निदर्शक चिन्हांनीं युक्त अशी सोन्यारुप्याचीं व तांब्यालोखंडाचीं निरनिराळीं नाणीं व्यापारांत चालू होतात व मग सराफाचा धंदा अवश्य होतो. त्यापासूनच पुढें मोठमोठ्या पेढ्या उत्पन्न होतात. या पेढीच्या व्यापाराचें पूर्ण स्वरूप आपणांस हल्लीं युरोपांत पहाण्यास सांपडतें. परंतु हें स्वरूप त्यास एकदम आलें नाहीं, ते हळूहळू येत गेलें; तें कसें हें प्रथमतः आपणास पहावयाचें आहे. युरोपांतील कलियुग संपून नवीन युगास तेराव्या शतकांत आरंभ झाला असें म्हणतात. या काळांत युरोपामध्यें व्यापारधंद्यांत, कलाकौशल्यांत व इतर सर्व बाबतींत इटली देशांतील संस्थानें पुढें होती. युरोपांतील बाकीचे देश या काळीं सुधारणेच्या व व्यापाराच्या कामांत बरेच मागे होते. इटली देशांतील व्हेनिस, जिनोआ, फ्लॉरेन्स वगैरे शहरें त्या काळी अत्यंत श्रीमान् होती. कारण युरोप व आशिया यांचेमधील व्यापाराचीं तीं नाकीं होती. त्या काळी हिंदुस्थान, इराण, चीन वैगैरे आशिया खंडांतील देश पुष्कळ भरभराटींत होते व कलाकौशल्याचे कामांत बरेच प्रवीण होते. या देशांतील माल इटलींतील वर निर्दिष्ट केलेलीं शहरें युरोपांत नेऊन विकीत व या व्यापारांत त्यांस अत्यंत फायदा होई. हा फायदेशीर व्यापार आपल्या हातांत यावा याच हेतूनें पोर्तुगाल व स्पेन या देशांतील दर्यावर्दी लोक हिंदुस्थानचा नवा रस्ता काढण्यास झटत होते. गलबतांवर गलबतें घेऊन हे लोक आफ्रिकेच्या किना-यानें खालीं खालीं जाण्याचा प्रयत्न करीत. वास्कोदिगामा यानें हा प्रयत्न सफल करुन शेवटीं एकदांचा हिंदुस्थानचां किनारा गांठला. हा हिंदुस्थानाचा मार्ग काढण्याच्या नादांत कोलंबसास अमेरिका सांपडली व या दोन मोठ्या गोष्टींनीं युरोपांतील देशाच्या भरभराटींत फरक झाले. पूर्वी इटली फार गबर होता व त्याच्या शहरांचें सर्व युरोपांत प्राबल्य असून त्याचा वैभवरवि उच्चीवर होता; परंतु अमेरिकेच्या शोधानें व हिंदुस्थानच्या नव्या मार्गानें त्यांचा हा वैभवसूर्य मावळला व स्पेन, पोर्तुगाल, बेल्जम व इंग्लंड या देशांस महत्व आले. या परिस्थितिभेदामुळे पेढीच्या व्यापाराचेंही स्थानांतर झाले. इटली देशांतील शहरांचा हजारों देशांशी संबंध येई. यामुळे त्या देशाच्या व्यापा-यांजवळ निरनिराळ्या देशांतील नाणीं जमत. या नाण्यांची योग्य किंमत ठरवून अदलाबदल करणें, तसेंच