या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३८१ ] व्याचें स्वरूप अगदीं उघड आहे. पुष्कळ माणसांस केव्हांना केव्हां दुस-या ठिकाणीं व हल्लींच्या सुधारलेल्या काळांत परदेशास पैसा पाठविण्याची गरज पडते. हे पैसे स्वतः पाठविण्याचें मनांत आणलें तर आधीं विश्वासू मनुष्य मिळाला पाहिजे व जरी मिळाला तरी ही पद्धति फार त्रासाची व खर्चाची आहे. तसेंच आपण प्रवासास निघालों आहों व आपणास एका गांवीं गेल्यावर पैशाची जरूरी आहे. अशा वेळीं आपणास हे पैसे सतत जवळ बाळगण्याचें जोखीम पतकरावें लागेल. तेव्हां हे पैसे नेण्याआणण्याचें काम दुसरे कोणी केल्यास मनुष्य या कामगिरीबद्दल कांहीं तरी कमिशन देण्यास तयार होईल. समजा तुम्हांस येथून काशीस पैसे पाठवावयाचे आहेत तर हे पैसे पेढीमार्फत पाठवितां येतात व या कामांत मनुष्याची फार सोय होते. तुम्हीं येथें पैसे भरले म्हणजे पेढीवाला तुम्हांस एक तितक्या रुपयांची दर्शनी हुंडी देतो व मग ती हुंडी तुम्हीं काशीस ज्या पेढीवर दिली असेल त्या पेढीकडे तुमच्या माणसानें ती हुंडी नेऊन दिली म्हणजे त्या मनुष्यास हुंडीत लिहिलेले पैसे रोख मिळतात. यालाच हुंडी पटणें म्हणतात. पेढीवाला या कामगिरीबद्दल थोडीशी हुंडणावळ घेतो. परंतु हा हुंडणावळीचा दर प्रत्यक्ष पैसे अगर नोटा पोस्टानें किंवा माणसाबरोबर पाठविण्याच्या खर्चापेक्षां कमी असला पाहिजे, हें उघड आहे. तरच लोक पेढीवाल्याच्या मार्फत पैसे पाठवितील. इतर तऱ्हेनें पेसे पाठविण्यास लागणा-या खर्चापेक्षां जर जास्ती दर पेढीवाला मागू लागला तर त्या पेढीवाल्यास कोणी गि-हाईकच मिळणार नाहीं. पेढीवाल्याचे निरनिराळ्या मुख्य ठिकाणीं आडते असतात त्यांचे मार्फत हा पैशाचा नेआणण्याचा व्यवहार चालतो, व तो दोन्ही पक्षांस फायदेशीर असतो. या हुंडीच्या पद्धतीनें देशांतील पैशाची देववेव किती तरी सुलभ होते. या पद्धतीनें प्रत्यक्ष रोख पैसे इकडून तिकडे पाठविण्याचा खटाटोप, खर्च व त्रास वांचतो. कारण एका ठिकाणच्या पेढीवाळ्याजवळ दुस-या गांवीं पाठविण्याकरितां पैसे आलेले असतात व त्याच्या दुस-या गांवच्या अडत्यांकडे या पहिल्या गांवीं पाठविण्याकरितां पैसे जमलेले असतात. आतां एकमेकांनी एकमेकांच्या हुंड्या स्वीकारल्या म्हणजे रोखपैसे न पाठवितां पैशाची देवघेव नुसत्या कागदपत्रानें होते. फक्त वर्षअखेर एकमेकांकडे कमीजास्त बाकी राहिली असेल तेवढी रकम मात्र रोख पाठविली म्हणजे झालें. या