या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८३]

व्याजाच्या दरानें पेढीनें कर्जाऊ पैसे घेतले असतील त्याच व्याजानें जर पेढीनें पैसे दिले तर पेढीस फायदा न होतां तोटाच होईल. म्हणून कर्जाऊ घेण्याच्या अगर ठेवीच्या व्याजाचा दर कर्जाऊ देण्याच्या व्याजाच्या दरापेक्षां नेहमीं कमी असलाच पाहिजे. असें नसलें तर पेढीचा व्यापार आंतवट्टय़ाचा होऊन पेढी बुडेल. पेढय़ा या शेतकीस पाणी पुरविणा-या तलावाप्रमाणें व्यापारास भांडवल पुरविणा-या संस्था होत. ज्याप्रमाणें लहान लहान ओढ्याचें पाणीं - जें निरर्थक वादून जात असतें तें-तलावांत एकत्र करून मग त्याचे पाट विवक्षित स्थळीं नेले जातात, त्याचप्रमाणें खासगी माणसांच्या घरीं निरर्थक पडून राहिलेले पैसे ठेवीच्या रुपानें जमवून पेढी व्यापारी लोकांस भांडवल पुरविते. तेव्हां व्यापाराच्या दृष्टीनें हेंही पेढीचें काम फार महत्वाचें आहे हें उघड आहे.
 पेढीचें चवथें काम म्हणजे चलनी नोटा काढणें. युरोपांतील सुधारलेल्या सर्व राष्ट्रांतील पेढ्यांस हा नोटा काढण्याचा अधिकार दिलेला असतो. हा अधिकार फार महत्वाचा असल्यामुळें त्यावर सरकारची देखरेख असते. व पेढ्यांनीं कोणत्या अटीवर कितीपर्यंत नोटा काढाव्या याबद्दल सक्त नियम केलेले असतात. त्या नियमांबरहुकूमच पेढ्यास चलनी नोटा काढतां येतात. हिंदुस्थान देशांत हा सर्व अधिकार सरकारानें आपल्या हातांत ठेवला आहे. सरकारचें चलनी नोटांबद्दलचें एक स्वतंत्र खातें आहे व त्या खात्याच्यामार्फत हा सर्व कारभार चालतो; परंतु दुसऱ्या देशांत चलनी नोटा काढणें हें पेढीचें एक महत्वाच्या कर्तव्यांपैकीं असतें. या आधिकारामुळेंही पेढ्यांस देशांतील व्यापारधंद्यास वाटेल तितकें भांडवल पुराविण्याचें सामर्थ्य येतें. या अधिकारामुळे या देशांत नवीन भांडवल उत्पन्न होतें. कारण या चलनी नोटा पेढीची साख उत्तम असली म्हणजे अगदी रोख पैशासारख्या चालतात. पत म्ह्णजे पैसा, या म्हणीची सत्यता या चलनी नोटांवरून दिसून येते. या चलनी नोटा म्हणजे पेढीच्या वतीनें मागाल तेव्हां रोख पैसा देऊं अशीं वचनें होत. अशीं वचने काढतांना तितकेच रोख पैसे पेढीनें आपल्या खजिन्यांत ठेविले तर पेढीस यापासून कांहींच फायदा नाहीं. लोकांस मात्र फार सोईचें नाणें मिळालें. परंतु सर्व वचनाइतका रोख पैसा ठेवण्याची गरजच नसते; एक लाखाच्या चलनी