या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८५]

त्याचा मुलगा कर्ता असेलच असा नेम नाही व म्हणून तो उद्योग बुडण्याचा जास्त संभव असतो. परंतु संयुक्त भांडवलाच्या उद्योगांचें तसें नसतें. एक मेनेजर मेला तर दुसरा चांगला मेनेजर नेमता येतो. व अशा तऱ्हेने उद्योगाच्या कायमपणास धक्का येत नाहीं. असे संयुक्ततत्त्वापासून अनेक फायदे आहेत: व यांचा तिसऱ्या पुस्तकातील एका भागांत विचार केला आहे. तेव्हां येथें त्याची पुनरुक्ति करण्याची जरुरी नाहीं. परंतु हे फायदे होण्यास लोकांनीं सचोटी हा अमोलिक गुण आपल्या अंगी आणला पाहिजे. त्याखेरीज या तत्त्वापासून होणाऱ्या फायद्यापेक्षां नुकसान जास्त होईल. परंतु सर्व धंद्यांमध्यें पेढीचा धंदा संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर चालविणें जास्त सोंईस्कर आहे. आडाम स्मिथनें आपल्या ग्रंथांत म्हटलें आहे कीं, त्यामध्यें सर्व व्यवहार नियमबद्ध करता येतो व पेढीच्या म्यानेजराच्या नुसत्या खुपीवर काहीं ठेविलें नाहीं तरी चालतें. यामुळें भागिदारानी एकदा शिस्त व नियम घालून देऊन ते नियम पाळले जात आहेत किंवा नाहींत हें दरवर्षी पहात गेलें म्हणजे लबाड्या फार होण्याचें कारण नाहीं. व लबाड्या फार झाल्या नाहींत व नियामानुरूप पेढीचें काम चाललें म्हणजे पेढीच्या व्यापारांत फायदा हा हटकून ठेविलेला. कारण या धंद्यांतील फायदा इतर धंद्यांप्रमाणें अनिश्चित नाहीं. तरी आमच्या लोकांनीं संयुक्त भांडवलाच्या तत्वावर पेढ्या काढण्याचा धंदा आधीं हातांत घ्यावा.
  हल्ली सरकारनें 'शेतकरी पेढ्या' म्हणून काढण्याकरितां जी खटपट चालविली आहे त्या शेतकरी पेढ्या या संयुक्त भांडवलाच्या तत्वाच्या पेढ्यांचाच एक प्रकार आहे. परंतु त्या पेढ्यांच्या स्वरूपाचें वर्णन मागेंच येऊन गेलें असल्यामुळें आतां पुन्हां त्याचा विचार करण्याची जरुरी नाहीं.असों.
  आमचे इकडे सरकारी पेढ्या म्हणजे फक्त पोस्टल सेव्हिंग बँकेच्या पेढ्या होत. इतर देशांत शेतकऱ्याकरितां व दुसऱ्याही कामाकरितां सरकारनें स्वतः पेढ्या काढल्या आहेत. या शिलकी पेढ्यांचें तत्वही नुकतेंच निघालेलें आहे. प्रथमतः १८६१ मध्यें सरकारनें या पोस्टल सेव्हिंग