या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३८९ ] असतें व या व्यापाराचें साधन ऐनजिनसी व्यवहार हें असतें. परंतु समाजाची संपत्ति वाढली व देशांत उद्योगधंदे सुरू झाले म्हणजे व्यापाराचें क्षेत्र वाढतें व अशा विस्तीर्ण व्यापाराला निष्कव्यवहाराची अवश्यकता उत्पन्न होते. आतां समाजाचे किंवा राष्ट्राचे दोन प्रमुख भेद होतात, शहरें व खेडगांवें. शहरें हीं उद्योगधंद्याचीं आगरें असतात तर खेडेगांवें हीं शेतकीचीं आगरें असतात; व या दोहोंमध्यें मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. व तो पैशाच्या योगानें चालतो. व्यापाराचीं हीं दोन्ही रूपें अन्तर्व्यापाराची होत. परंतु व्यापाराची या पुढली पायरी म्हणजे बहिर्व्यापाराची होय, म्हणजे आतां एका देशाचा दुस-या परकी देशाशीं व्यापार सुरु होतो, व यालाच बहिर्व्यापार अगर अंतर्राष्ट्रीय व्यापार म्हणतात. व या व्यापाराच्या वाढीबरोबरच पतीच्या व्यवहाराची विशेष अवश्यकता उत्पन्न होते व हे विराटस्वरूपी व्यापार, विश्वासव्यवहारानें चालू लागतात. तेव्हां बहिर्व्यापाराचे स्वरुप व त्याची मीमांसा याच्या विचारास आतां लागलें पाहिजे. व्यापाराच्या उत्क्रांतीमध्यें बहिर्व्यापार हें एकंदर व्यापाराचें परिणत स्वरूप असल्यामुळे त्याचा स्वतंत्र विचार करणें शास्त्रीयदृष्ट्या इष्ट आहे. शिवाय ऐतिहासिकदृष्टयाही या विषयाचें फार महत्व आहे. कारण युरोपमध्यें अर्थशास्त्राला व्यवस्थित स्वरूप आल्यापासून या बहिर्व्यापाराला फार महत्व दिलें गेलें आहे. कारण या व्यापाराच्या योगानेंच देशामध्यें संपत्ति वाढते. अर्थात बहिर्व्यापार हा संपत्तीचा मुख्य झरा आहे अशी कल्पना होती. व युरोपांतल्या बहुतेक राष्ट्रांची धडपड हा बहिर्व्यापार आपल्या ताब्यांत येण्याकरितां होती. अमेरिका व हिंदुस्थानचा जलमार्ग हे उद्योगदृष्टीनें क्रांतिकारक शोध याच धडपडीचीं फळें होत. या शोधापूर्वी आशिया, हिंदुस्थान व युरोप यांमध्यें व्यापार खुष्कींच्या मार्गानें चाले व तो व्यापार इटाली देशांतील व्हेनिस, जिनोआ वगैरे मेदिटरेनियन समुद्राच्या कांठच्या शहराच्या ताब्यांत होता व या व्यापाराच्या योगानें तीं शहरें संपत्तीचीं आगरें बनलीं होतीं. तेव्हां हा किफायतशीर व्यापार आपल्या ताब्यांत यावा याकरितां त्या काळीं पुढारलेल्या स्पेन व पोर्तुगाल या देशांतील लोकांची सारखी खटपट चालू होती. पोर्तुगालूच्या हेन्री या नांवाच्या युवराजाला तर या गोष्टीचा निजध्यास लागलेला होता व यामुळे तो आफ्रिकेच्या किना-याच्या बाजूनें गलबतावर गलबत