या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३९२] बहिर्व्यापाराचें कार्य आहे. प्रथमतः बहिर्व्यापाराने ज्या वस्तू देशांत होत नाहीत किंवा होणें शक्य नाहींत अशा वस्तू त्या देशाला उपलब्ध होतात. उदाहरणार्थ, फक्त उष्णकटिबंधांतच होणारे मसाल्यादि पदार्थ शीतकटिबंधांतील देशांना या व्यापारानें मिळू लागले. दुसरें, जो माल तयार करण्यास देशाला विशेष योजना किंवा सोय नाहीं असा माल बहिर्व्यापाराने देशाला सुलभ रीतीनें मिळू शकतो. पहिला फायदा व दुसरा फायदा यांमध्यें केव्हां केव्हां अल्प फरक असतोः अॅडाम स्मिथनें यासंबंधाचा एक सयुक्तिक दाखला दिला आहे. तो ह्मणतो:"कांचेच्या तावदानाच्या साहाय्यानें व कृत्रिम उष्णतेनें स्कॉटलंडमध्यें सुद्धां द्राक्षे पिकवितां येतील व त्यापासून इतर ठिकाणांपेक्षां तीस पटींच्या खर्चानें उत्तम मद्यही तयार करतां येईल. परंतु असें करणें देशाच्या नुकसानीचें होईल. तेव्हां अशा वस्तू बहिर्व्यापाराने मिळविणें इष्ट आहे. तिसरें, बहिर्व्यापाराच्या योगानें देशांतील मालाला मागणी जास्त होते व त्यायोगें श्रमविभागाचें तत्व जास्त प्रमाणांत अंमलांत आणण्यास सांपडतें. म्हणून संपत्तीची उत्पत्ति वाढते व एकंदरींत बहिर्व्यापाराच्यायोगाने देशाला आपली औद्योगिक कार्यक्षमता वाढवितां येते असें म्हणण्यास हरकत नाहीं. हे झाले प्रत्यक्ष फायदे! याखेरीज बौद्धिक, सामाजिक व नैतिक फायदे होतात ते निराळेच. बहिर्व्यापाराने दोन देशांमध्यें दळणवळण सुरू होतें. त्यायोगानें देशांतील लोकांच्या ज्ञानवृद्धींत भर पडतें ! प्रवासानें देशांतील संकुचित दृष्टेि नाहींशी होते. त्यायोगानें देशांतील लोकांचें कुपामान्डूकत्व नाहींसें होतें. सारांश,बहिर्व्यापार हा एकंदर देशाच्या सुधारणेच्या मार्गक्रमणाला कारणीभूत होतो असे म्हणण्यास हरकत नाहीं.

 येथपर्यंत या विषयाचा सामान्यतः विचार झाला. आतां त्याचा विशेष बारकाईनें विचार केला पाहिजे. परंतु हा विचार करतांना खालील गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत म्हणजे या भानगडीच्या प्रश्नाचा उलगडा सुलभ होईल. प्रथमतः बहिर्व्यापार ज्या अर्थी पैशाच्या देवघेवीनें निदान पैशाच्या हिशोबानेंच होतो-त्या अर्थी पैशाच्या भाषेंतच या व्यापाराची मीमांसा करणें इष्ट आहे व दोन्ही देशांची चलनपद्धति एकच आहे असें धरून चालणें सोयीचें आहे. दुसरी गृहीत गोष्ट म्हणजे दोन देशांमध्ये फक्त मालाची अदलाबदल होते. मालाची उत्पादक करणें जीं भांड-