या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९७] याच दृष्टीनें कॅरे या अमेरिकन अर्थशास्त्रकारानें देशांतील कच्चा माल बाहेर देशी पाठविणें म्हणजे देशांतील जमीनच बाहेर देशीं पाठविण्यासारखे आहे असें म्हटले आहे. परदेशी स्वस्त माल शेवटीं स्वस्त असेल असें कांहीं खात्रीनें सांगतां येणार नाही. व देशांतील माल खरोखरीं शेवटीं जास्त टिकाऊ व म्हणून खरोखरी स्वस्त असेल. परंतु अशा स्वस्त मालाच्या आयातीनें देशी मालाचा धंदा नाहींसा होईल व म्हणून देशांतील लोकांचें शेवटीं नुकसानच होईल. प्रत्येक देशामध्यें शहरें व खेडेगांवें यांमध्यें व्यापार चालत असतो व त्यामुळे दोघांची भरभराट होत असते. कारण खेड्यांतील शेतकीच्या मालाला शहरें हीं गिऱ्हाईकें असतात व शहरांतील कारखान्याच्या मालाला खेडगांवें हीं गिऱ्हाईकें असतात. आतां बहिर्व्यापाराने शहरांना शेतकीचा माल बाहेरून स्वस्त मिळू लागला व त्याच्या मोबदला कारखान्यांतला माल ते बाहेर पाठवू लागले तर हा व्यापार कारखानदारांना किफाईतशीर होईल. परंतु त्यायोगानें खेड्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान होईल व खेडीं ओसाड पडूं लागतील व शहरांमध्यें लोकवस्ती वाढेल खरी, तरी पण शहराच्या आकस्मिक व जलद वाढीनें शहरांतील राहणी आरोग्याला हानिकारक होईल व यामुळे एकंदर मजूर वर्गाची कार्यक्षमता कमी होऊन देशाचें नुकसान होईल. तसेच एखाद्या देशांत कारखान्याची व शहरांची वाढ हळू हळू चालू आहे अशा वेळीं जर देशांत बहिर्व्यापार सुरू होऊन कारखान्याचा माल स्वस्त मिळू लागला तर शहरांची व कारखान्याची वाढ खुंटेल व शहरांची दैन्यावस्था झाल्यामुळे खेडगांवांची अर्थात शेतकीची थोडीबहुत हलाखी होईल. हल्लींच्या काळीं सर्व जगाचा एक बाजार झालेला आहे व दळणवळणाच्या साधनांच्या वाढीनें बहिर्व्यापाराला अन्तर्व्यापारामध्ये स्वरूप येत आहे. व अन्तर्व्यापारामध्ये चढाओढीनें ज्याप्रमाणें एक ठिकाणचा व्यापार दुसऱ्या ठिकाणी जातो- कारण त्या ठिकाणी जास्त सोय असते- परंतु या स्थलांतरानें देशाचें नुकसान होत नाही. तरी पण बहिर्व्यापाराने एका देशांतील व्यापार दुसऱ्या देशांत जाईल व ही गोष्ट जगाच्या दृटीनें फायद्याची असली तरी या देशाच्या दृष्टीनें ती अत्यंत अनिष्ट आहे हे उघड आहे.