या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९९] पैशाच्या रकमेपेक्षां जास्त पैसा आपल्या घरांत ठेवीत नाहीं. त्याच्याजवळ पेढीचें चेकबुक असतें व जसजसे त्याला दुस-याला पैसे द्यावे लागतात तसतसे ती बुकांतील चेकांनीं पैसे देतो; व जसजसे रोख पैसे त्याचेकडे येतील तसतसे ते पेढीवर भरीत असतो. मनुष्य शहाजोग असला व ज्या पेढीवर चेक काढला असेल ती पेढीही शहाजोग असली तर त्या माणसाचा चेक कोणीही मनुष्य पैशाप्रमाणें बिनहरकत घेतो व तो मनुष्य दुस-यास हा चेक आपल्या देण्यांत देतो. याप्रमाणें चेक निघाल्यापासून तों पेढींवर पटेपर्यंत हव्या तितक्या लोकांच्या हातून जाऊं शकतो व या सर्व व्यवहारांत व अदलाबदलींत या चेकाचा अगदी कागदीचलनासारखा उपयोग होतो. ज्याप्रमाणें पेढीवर आपला पैशाच्या व्यवहार ठेवणा-यांनीं काढलेल्या पैशाच्या मागणीचा हुकूम ह्मणजे चेक होय. त्याप्रमाणें एका पेढीने दुस-या पेढीवर काढलेला पैशाच्या मागणीचा हुकूम ह्मणजे हुंडी होय. देशांतील निरानराळ्या पेढ्यांचा एकमेकांशीं व्यवहार असतो. व या पेढ्या लोकांना वाटेल त्या ठिकाणीं पैसे पोंचविण्याचा धंदा करितात हें मार्गे सांगितलेंच आहे व हा धंदा या पेढ्या प्रत्यक्ष रोख पैसे पाठवून करीत. नाहींत. कारण यामध्यें फारच त्रास असतो. तर या पेढ्या अशी पैशाची देवघेव हुंड्याच्या द्वारें करितात. एखाद्यास एका परगांवीं पैसे पाठवावयाचे आहेत अशी कल्पना करा. आतां असा मनुष्य गांवांतील पेढीकडे जातो व रोख पैसे भरतो व पेढीवाला ज्या गांवीं पैसे पाठवावयाचे आहेत त्या गांवच्या पेढीवर हुंडी करतो व ती हुंडी या माणसाला देतो. दोन्ही पेढ्यांची पत उत्तम असली ह्मणजे या हुंड्याही या माणसाच्या हातून त्या माणसाच्या हातांत याप्रमाणें देववघेवींत चालतात व शेवटीं पेढीच्या हातीं येईपर्यंत त्याचा उपयोग थेट पैशासारखा होतो. ज्याप्रमाणें खासगी व्यक्तीच्या पेढीशी असलेल्या व्यवहारानें चेक अस्तित्वांत येतात, व ज्याप्रमाणें पेढ्यापेढ्यांच्या व्यवहारानें हुंड्या अस्तित्वांत येतात त्याप्रमाणें व्यापा-याव्यापा-यांच्या व्यवहारानें-विशेषतः बहिर्व्यापाराच्या व्यवहारानें-विनिमयपत्रं अस्तित्वांत येतात. तेव्हां या विनिमयपत्रांचे स्वरूप काय व त्यांची घडामोड कशी चालते हे पाहिलें पाहिजे.