या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग सोळावा. अप्रतिबंध व्यापार विरुद्ध संरक्षण.

अप्रतिबंध व्यापार विरुद्ध संरक्षण हा अर्थशास्त्रांतील निरंतरचा वादग्रस्त प्रश्न आहे. या प्रश्नासंबंधी इंग्रजीमध्यें वाङ्मयही पुष्कळ आहे. त्या सगळ्याचा सविस्तर विचार एका लहानशा भागांत करणें शक्य नाही. या वादांतील मूलभूत प्रमाणांचा सामान्य विचार करून त्यांतील रहस्य काय आहे एवढेंच येथें सांगण्याचा विचार आहे. हिंदुस्थानाला कोणतें तंत्र लागू करावयाचें या प्रश्नाचा ऊहापोह या ग्रंथाच्या शेवटल्या पुस्तकांत करावयाचा आहे. तेव्हां येथें फक्त या प्रश्नाचा तात्विकदृष्टया विचार केला म्हणज पुरें आहे. या ग्रंथांतील प्रास्ताविक पुस्तकाच्या पहिल्या भागाकडे दृष्टि फेंकली असतां हा वाद अर्थशास्त्राच्या उदयापासूनचा आहे असें दिसून येईल. उदीमपंथ व निसर्गपंथ यांच्यामध्यें हा एक वादाचा मुद्दा होता. उदीमपंथी लाकांचे असे म्हणणें होतें की, देशाची सांपत्तिक वाढ बहिर्व्यापरावर -विशेषतः कारखानी मालाच्या वाढीवर अवलंबून आहे व म्हणून देशांतील सरकारने परदेशी मालावर जबर जकाती बसवून देशांतील कारखान्याची वाढ घडवून आणली पाहिजे. म्हणजे देशाच्या सांपत्तिक वाढीस संरक्षणतत्वाचा अवलंब करणें अवश्य आहे असें उदीमपंथाचें म्हणणें होतें. निसर्गपंथाच्या मताप्रमाणें व्यापाराच्या कामांत सरकारला हात घालण्याचें कारण नाहीं; कारण सरकारची ढवळाढवळ ही नेहमींच नुकसानीची असणार. मानवी स्वभावाकडे नजर देतां खुला व्यापार हें तत्व देशाच्या सांपत्तिक वाढीस श्रेयस्कर आहे. अॅडाम स्मिथच्या पुस्तकाचा सर्व रोंख उदीमपंथी संरक्षणाच्या धोरणाचा फोलपणा-नव्हे घातकीपणा-दाखविण्याकडे व अप्रतिबंध व्यापारी तत्वाची श्रेयस्करता दाखविण्याकडे होता. उदीमपंथाची इंग्लंडवर पुष्कळ वर्षेपर्यंत विलक्षण छाप होती व या उदीमपंथी धोरणाच्या योजनेनें इंग्लंडनें आपल्याला सर्व जगांत औद्योगिक