या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४१९] भागविण्याकरितां सरकारला खर्च कसा लागतो हें ठरवावयाचें आहे. या बाबतींत अॅडाम स्मिथच्या काळच्या व हल्लींच्या काळच्या कल्पनांत कसा फरक झाला आहे, हें दाखवावयाचें आहे. नंतर सरकारच्या उत्पन्नाचें वर्गीकरण करून त्या प्रत्येक वर्गाचे थोडें थोडें विवेचन करण्याचा विचार आहे. सुधारलेल्या देशांत सरकारची उत्पन्नाची मुख्य बाब कर हीच होय. तेव्हां कराचे स्वरूप व त्याची तत्त्वें यांचे सविस्तर विवेचन करावयाचे आहे. पुढें या कराचा बोजा समाजांतील निरनिराळ्या वर्गांवर कसकसा वांटला जातो व त्याचे सांपत्तिक स्थितीवर कसकसे परिणाम होतात हें पहावयाचें आहे. त्यानंतर हिंदुस्थानच्या जमाखर्चाचे सामान्य स्वरूप व येथील कराचे प्रकारें व हिंदुस्थानचा मुख्य कर जो जमीनसारा त्यासंबंधाचा वादग्रस्त प्रश्न यांचा ऊहापोह येथें करण्याचा विचार आहे. नंतर राष्ट्रीय कर्जांचे स्वरूप, त्याची वाढ वगैरे प्रश्नांचा विचार करून शेवटी हिंदुस्थानच्या राष्ट्रीय कर्जाचा इतिहास देऊन हें पुस्तक संपविण्याचा विचार आहे. _______ भाग दुसरा

अॅडाम स्मिथच्या मताप्रमाणें सरकारचीं कर्तव्यकर्में ___________

अॅडाम स्मिथचीं राजकीय मतें फ्रान्समधील तत्ववेत्ते व निसर्गपंथी लोक यांच्या मताप्रमाणेंच होतीं याचा उल्लेख मागें एक दोन वेळा आलाच आहे. त्याचें प्रत्यक्ष प्रत्यंतर अॅडाम स्मिथच्या या विषयावरील विवेचनावरून उत्तम पटतें. राजनीतिशास्त्रांत ज्याला व्यक्तिक तत्व म्हणतात त्याचा अॅडाम स्मिथ हा पुरस्कर्ता होता. म्हणजे समाजांत सरकारचें कर्तव्यकर्म जितकें कमी करतां येईल तितकें इष्ट आहे व होतां होईल तोपर्यंत समाजातील व्यक्तीस सर्व बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याकरिता जितका प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर दाब ठेवणें जरूर आहे तितका दाब सरकारने ठेवावा. सरकार ही संस्थाच मुळीं व्यक्तीचें स्वातंत्र्य व इतर स्वाभाविक हक्क यांचे रक्षण करण्याकरिता आहे व रक्षणाला जितक्या