या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४२१] कारण त्याला देशांत शांतता ठेवितां आली. व आपले शहाणपणाचे कायदे यांची अम्मलबजावणी करतां आली. बंदुकादि अस्त्राच्या शोधानें युद्धकलेंत मोठी क्रांति केली आहे व सैन्य ठेवणें हें फार खर्चाचें काम झालें आहे. पूर्वींच्या युद्धपद्धतींत जास्त सुधारलेल्या राष्ट्रांतील लोकांचा रानटी स्थितीतील लोकांच्या हल्ल्यापुढें टिकाव लागणें कठिण असे. कारण कंटकपणा, शौर्य इत्यादि गुण रानटी लोकांसच जास्त असतात. परंतु अर्वाचीन काळीं सैन्य ठेवण्याचा खर्च रानटी व गरीब राष्ट्रांना करतां येत नाहीं. यामुळे अशा राष्ट्रांचाच सुधारलेल्या राष्ट्रांपुढें टिकाव निघत नाहीं. सरकारचें दुसरें कर्तव्यकर्म म्हणजे समाजांतील व्यक्तींना न्याय देणें हें होय. खासगी व्यक्तीच्या जुलुमापासून व अन्यायापासून जीवित व मालमत्ता याचें रक्षण करणें हें कर्तव्यकर्मही समाजाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्यें कमी अधिक खर्चाचें असतें. मृगयावृत्ति समाजांत थोड्या दिवसांच्या सामग्रीपलीकडे फारशा मालमत्तेचा संचय मनुष्याजवळ नसतो. या काळीं एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याची कागाळी त्याच्या शरीरावर हल्ला करून किंवा त्याच्या मनाला लागेल असें बोलूनच करूं शकतो. व या कागाळीपासून मत्सर किंवा द्वेष या दोन मनोविकारांच्या तृप्तीखेरीज त्याला दुसरा कांहीं एक दृश्य फायदा होत नाही. परंतु हे मनोविकार कधीं काळींच उदभूत होण्याचा संभव असतो व ज्याचा तो प्रतिकार करण्यास समर्थ असतो. व म्हणून या काळीं न्यायाधिशाची जरूरीच पडत नाही. परंतु मालमत्तेच्या वाढीबरोबर व संचयाबरोबर महत्वाकांक्षा, लोभ, सुखाची आवड, श्रमाचा कंटाळा वगैरे मनोविकार प्रबळ होऊन दुसऱ्याची मालमत्ता अन्यायानें घेण्याची प्रवृत्ति होते व अशी स्थिति उत्पन्न झाली म्हणजे न्यायाधीश व न्यायखातें यांची अवश्यकता उत्पन्न होते. परंतु न्यायव्यवस्था सुरू होण्यास व मनुष्यांना ती प्रिय होण्यास मनुष्यामध्यें एक प्रकारची दुसऱ्याच्या ताबेदारींत राहण्याची संवय लागते व खालील चार कारणांनीं मालमत्तेच्या वाढीबरोबर मनुष्यामध्यें अधिकार व ताबेदारी हे गुण प्रादुर्भूत होऊं लागतात. सामर्थ्य, सौंदर्य, चपलता, शहाणपण, दूरदर्शीपणा, न्यायीपणा इत्यादि शारीरिक व मानसिक गुण याबद्दल सर्व काळीं आदरबुद्धि उत्पन्न होते