या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४३२] संस्थांचा खर्चही फीमधून भागविणें एकंदरींत श्रेयस्कर आहे. परंतु सरकारच्या सर्व कर्तव्यकर्माच्या पूर्ततेमध्यें कोठेही खर्चाची नड आल्यास ती सरकारच्या सामान्य उत्पन्नांतून भागविली पाहिजे हें उघड आहे. अॅडाम स्मिथचें सरकारच्या कर्तव्यकर्माबद्दल व त्या प्रीत्यर्थ सरकारला पडणाऱ्या खर्चाबद्दलचें मत आम्हीं थोड्या विस्तारानें येथें दिलें आहे. याच कारण असें आहे कीं, अॅडाम स्मिथ हा अप्रतिबंध व्यापाराचा मोठा समर्थक असल्यामुळे सरकारच्या कर्तव्याबद्दल त्याची कल्पना फार संकुचित होती असें मानण्याचा सांप्रदाय आहे. परंतु वरील विवेचनावरून अॅडाम स्मिथची कल्पना सामान्य समज आहे तितकी संकुचित नाहीं असें दिसून आल्यावांचून राहणार नाही. अॅडाम स्मिथनें सरकारचें कर्तव्यकर्म व्यावहारिक तऱ्हेनें दिलेली आहेत अर्थात सुधारलेल्या सरकारकडे पाहिलें म्हणजे त्या सरकारचीं प्रत्यक्ष सृष्टीत जीं जीं कर्तव्यकर्में दिसून येतात त्यांना शास्त्रीय किंवा तात्विंक स्वरूप न देतां जशीच्या तशीं दिलीं आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक सरकारचें लष्करी अारमारी कर्तव्यकर्में होतात. परंतु ज्यांनीं राष्ट्रीय जमाखर्चाचे शास्त्र बनविलें आहें, त्यांनीं सरकारच्या कर्तव्यकर्मार्च थोडें तात्विक व शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण केलें आहे. अर्वाचीन काळी सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें सरकारच्या कर्तव्यकर्माची व्याप्ती बरीच वाढली आहे हें खरें, तरी पण त्या सर्वाचा समावेश पूर्वींच्या व्याख्येंत करता येण्यासारखा आहे. म्हणजे त्या कर्तव्यांची मर्यादा वाढली इतकेंच. पुढील भागांत अर्वाचीन शास्त्रज्ञांनी केलेल्या सरकारच्या कर्तव्याकार्मांच्या वर्गीकरणाचें विवेचन करूं.