या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४३६1 समावेश होतो. या धंद्याच्या वस्तू ज्यांना पाहिजे असतात त्यांनाच यापासून फायदा होतो. बाकीच्यांचा येथें संबंध येत नाहीं.

    हल्लींचीं सुधारलेलीं सरकारें जीं जीं कामें हातीं घेतें त्या त्या कामांचा या कर्तव्यचतुष्टयामध्यें समावेश होतो, असें थोडक्या बारकाईनें विचार केला म्हणजे दिसून आल्याखेरीज राहणार नाहीं.
    आतां हीं कर्तव्यकर्में बजावण्याकरितां सरकारला पैसे लागतात. कारण यांतलीं शेवटल्याखेरीज बाकीचीं कर्तव्यकर्मे म्हणजे ब-याच खर्चाचीं असतात. तेव्हां सरकारला हीं कर्तव्यकर्में बजावतां येण्याकरितां कायमच्या उत्पन्नाच्या बाबी लागतात. कारण हीं कर्तव्यकर्में कायम व सतत चालणारीं असतात. सरकारचीं कांहीं कर्तव्यकर्में यांमधूनच परंतु प्रसंगानें व आकस्मिक तऱ्हेनें उद्भवतात. जसें लढाई किंवा एखाद्या शोधाकरितां लागणारा खर्च किंवा खानेसुमारीचा खर्च, तेव्हां सरकारलाही दोन तऱ्हांचा खर्च आहे. एक सततचा व नेहेमीं लागणारा खर्च, व एक आकस्मिक व प्रासंगिक कारणांनीं लागणारा खर्च. पहिल्या प्रकारचा खर्च सरकार बहुतेक कायमच्या व नेहेमीं येणा-या करांसारख्या उत्पन्नांतून भागावितें व दुस-या प्रकारचा खर्च व एकंदर कर्तव्यांपैकीं उद्योगधंद्यांचा प्रारंभींचा खर्च सरकार कर्ज काढून भागवितें. तेव्हा या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नांचा विचार निरनिराळा करणें सोईचें आहे. तेव्हां पुढल्या भागांत सरकारच्या कायमच्या उत्पन्नाच्या बाबींचा विचार करुं.