या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४३९, ]

     करांचें वर्गीकरण निरनिराळ्या अर्थशास्त्रकारांनीं निरनिराळ्या तत्वांवर केलें आहे. अॅडाम स्मिथनें उत्पन्नाचे जे मुख्य तीन प्रकार त्यांवरून करांचें वर्गीकरण केलें आहे. जमिनीच्या खंडावरील कर, नफ्यावरील कर व मजुरीवरील कर व ज्या कराचा कोणत्याही विशेष उत्पन्नाशीं संबंध नाहीं अशा कराचा एक स्वतंत्र वर्ग त्यानें केला आहे. मिळून त्यानें करांचे चार वर्ग केले आहेत. परंतु या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकामध्यें सांगितल्याप्रमाणें हल्लीं उत्पन्नाचे चार वर्ग समजतात. शिवाय नफा, व्याज व मजुरी हे तीन उत्पन्नाचे प्रकार अर्थशास्त्रदृष्ट्या भिन्न भिन्न असले तरी करांच्या दृष्टीनें त्यांत फरक नाहीं व यामुळें या उत्पन्नावर सररहा कर बसविला जातो व यालाच प्राप्तीवरील कर म्हणतात. तेव्हां जरी अॅडाम स्मिथचें वर्गीकरण तात्विक दृष्टीनें ठीक असलें तरी त्याचा प्रत्यक्ष व्यवहारांत फारसा उपयोग नाहीं. याचें कारण निरनिराळ्या उत्पन्नाच्या प्रकारांवर पडणारे कर प्रत्यक्ष सृष्टींत फार थोडे आहेत. तेव्हां हें वर्गीकरण एका दृष्टीनें रिकामें राहतें. सरकारी जमाखर्चाच्या दृष्टीनें कराचा बोजा कोणावर किती पडतो हें पाहणें विशेष महत्वाचें आहे व याच दृष्टीनें कराचें प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हें जें वर्गीकरण केलेलें आहे तें जास्त उपयुक्त आहे.
     प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर यांमध्यें दोन बाजूंनीं फरक दाखविला जातो. ज्या करामध्यें कर देणारा व ज्यावर कराचा बोजा पडतो तो अगर कर सहन करणारा या व्यक्ति एकच असतात तो प्रत्यक्ष कर होय. परंतु ज्या करामध्यें कर देणारा व कर सहन करणारा या व्यक्ति निरनिराळ्या असतात, तो अप्रत्यक्ष कर होय. दुस-याही एका दृष्टीनें या दोहोंमध्यें फरक दाखविला जातो. प्रत्यक्ष कर हा पूर्वी ठरलेल्या कांहीं एका विशिष्ट गुणावरून-जसें पदवी मालमत्ता, उत्पन्न किंवा दर्जा-कांहीं ठरलेल्या परिमाणानें आकारला जातो. अर्थात् या कराचा आकार व अांकडा हा आधीं निश्चित असतो व अशा कर भरणारांची यादी असते व तो कर यादीप्रमाणें वसूल केला जातो. अप्रत्यक्ष कर हे पूर्वी निश्चित करतां येत नाहींत. ते कांहीं भावाप्रमाणें कांहीं व्यवहारावर ठरविलेले असतात व ते कोष्टकांतील नियमानें वसूल केले जातात. जमिनीवरील कर प्राप्तीवरील कर, मालमत्तेवरील कर, घरपट्टी, डोईपट्टी, कांहीं विशिष्ट वर्गावरील कर, विशिष्ट धंद्यांवरील कर, हे सर्व प्रत्यक्ष कराच्या