या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

੪੪੦ ] वर्गांत येतात. हे कर ज्यांकडून वसूल केले जातात त्यांच्यावर पडतात किंवा ते त्यांवर पडावे असा करार बसविणारांचा उद्देश तरी निदान असतो. आयात व निर्यात जकाती व अन्तर्जकाती या सर्व अप्रत्यक्ष कराच्या वर्गांत मोडतात. आयात मालावरील जकातींना आयात जकाती म्हणतात, निर्यात मालावरील जकातींना निर्यात जकाती म्हणतात व देशांतच उत्पन्न झालेल्या देशांतच खपणा-या मालावरील जकातींना अन्तर्जकाती म्हणतात. या सर्व जकाती आयात व्यापारी, निर्यात व्यापारी व कारखानदार किंवा घाऊक व्यापारी प्रथमतः देतात खरे; तरी पण हा कर शेवटीं निरनिराळ्या प्रकारचा माल खरेदी करणा-या गि-हाइकांवर पडतो. म्हणूनच अशा करांना अप्रत्यक्ष कर म्हणतात. केव्हां केव्हां अमुक कर प्रत्यक्ष आहे किंवा अप्रत्यक्ष हें सांगणें फार कठिण आहे. कारण चढाओढीनें कराचा बोजाही दुस-यावर टाकण्याची सार्वत्रिक प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, जमिनीवरील कर व घरांवरील कर, हे प्रत्यक्ष करामध्यें मोडतात खरे. तरी पण घरवाल्याचा प्रयत्न कराच्या मानानें जास्त भाडें काढण्याचा असतो. म्हणजे आपल्यावरील कराचा बोजा होतांहोईल तों भाडेंक-यांवर टाकण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसेंच जमिनीच्या भाड्याचा बाेजा कुळांवर टाकण्याचा प्रयत्न जमिनीचा मालक करीत असतो. व कुळे अनन्यगतिक असलीं म्हणजे त्यांनाच असा नवा कर देणें भाग पडतें. परंतु याप्रमाणें जरी विशिष्ट करासंबंधानें अडचण पडली तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर हें वर्गीकरण स्पष्ट आहे व ते उपयुक्तही आहे.

     करांचे आणखीही पुष्कळ तऱ्हेनें वर्गीकरण केलेलें आहे. त्यांपैकीं भांडवलावरील व उत्पन्नावरील कर हा भेद केव्हां केव्हां ध्यानांत ठेवण्यासारखा असतो. हा भेद त्याच्या नांवावरूनच स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय जमाखर्चीशास्त्राचें एक तत्व असें आहे कीं, कर होतां होईल तों भांडवलावर असू नये कारण अशा करानें देशाचें भांडवलच कमी होतें व भांडवल विण्याच्या प्रवृत्तीला धक्का बसतो ही देशाच्या अहिताची आहे.
     वर सांगितलेंच आहे कीं, देशाच्या औद्योगिक व सांपत्तिक वाढीबरोबर सरकारच्या उत्पन्नाचा तिसरा वर्ग थोडा कमी महत्त्वाचा होतो;कालेंकरून दुसऱ्याचेंही महत्त्व कमी  होतें व सर्व सुधारलेल्या देशांत करांना जास्त महत्व येतें. कांहीं कांहीं अर्थशास्त्री व मुत्सद्दी  हे प्रत्यक्ष करां