या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४५८]

जास्त सुधारणा झालेली असल्यामुळें व हेच देश व्यापारधंद्यांत युरोपपेक्षां पुढें असल्यामुळे इटली देशांतील शहरांना या व्यापारापासून फार फायदा होत असे. यामुळें या शहरांना या काळीं फार महत्व असे व तीं फार धनाढ्य झालीं होतीं. याच व्यापारी फायद्याच्या लालचीनें युरोपच्या पश्चिमेकडील स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड व हॉलंड या देशांतील व्यापारी व खलाशी एशियाशीं दळणवळणाचा नवा मार्ग शोधून काढण्यास धडपडत होते व या स्वार्थीपणाच्या धडपडीतच अमेरिका या नवीन खंडाचा शोध लागला. इटली देशांतील हीं शहरें व्यापारानेंच कीतींस चढलीं असल्यामुळें व्यापारी लोकांचें प्राबल्य तेथें फार झालें व म्हणूनच तेथील राज्यें प्रजासत्ताक म्हणण्यापेक्षां धनिकसत्ताक होतीं असें म्हणणें वाजवी आहे. लहान लहान संस्थानांत सरकारचें स्थैर्य असल्यामुळें व शांतता असल्यामुळें व्यापाऱ्यांचा आपल्या सरकारावर पूर्ण विश्वास होता व अशा स्थितीत व्यापारी आपल्या धंद्यास न लागणारें भांडवल सरकारास देण्यास अगदीं एका पायावर तयार असत.
  इंग्लंड, फ्रान्स वगैरे मोठमोठ्या राष्ट्रांनीं इटली देशांतल्या या संस्थांच्या पद्धतीवरून राष्ट्रीय कर्जाची पद्धति उचलली. युरोपांतल्या मोठमोठ्या सर्व राष्ट्रांमध्यें इंग्लंडला लवकर अनुकूल स्थिति आल्यामुळें इंग्लंडमध्यें या पद्धतीचा प्रसार फार लवकर झाला. यामुळेंच इंग्लंडाचें राष्ट्रीय कर्ज इतर सर्व देशांपेक्षां फार जुनें आहे. नॉर्मन लोकांनीं इंग्लंड काबीज केल्यापासून तेथें जोरदार सरकार उत्पन्न झालें व सर्व देशभर शांतता झाली व फ्रान्साप्रमाणें सरदार लोकांचें प्राबल्य राहिलें नाहीं. इंग्लंडमध्यें जहागिरीपद्धति सुरु होती तोंपर्यत राजाला लढाईकरितां खर्च नसे. कारण प्रत्येक सरदारानें व इनामदारानें कांहीं लोकांनिशीं राजा बोलावील तेव्हां आलेंच पाहिजे असा नियम होता. राजाच्या स्वतःच्या जमिनीही पुष्कळ असत. त्यांचें उत्पन्न त्याच्या नेहमींच्या खर्चास पुरत असे.परंतु जहागिरीपद्धतीचा नाश झाल्यावर लढाईकरितां पैशाची जरूर लागू लागली. तसेंच राजाच्या जमिनी नाहींशा झाल्यामुळे राजाच्या नेहमींच्या खर्चास करानें पैसे वसूल करणें भागू पडू लागलें व इंग्लंडाच्या राजकीय प्रगतीमुळे पैशासंबंधीं व करासंबंधी सर्व अधिकार पार्लमेंट सभेस आला होता. जेव्हां राजास पैशाची जरूर लागे तेव्हा त्याला पार्लमेंटची पायधरणी करणें भाग पडे व पार्लमेंटच्या