या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अर्थशास्राचीं मूलतत्वें.

                  -----------------------------
                       पुस्तक ६ वें.
                      -------------------
हिंदुस्थानदेशाची सद्यः सांपत्तिक स्थितेि व तिला लागू पडण्यासारख्या सिद्धांतांचें विवेचन.
                 ------------------------------
  मागील पांच पुस्तकांत अर्थशाखाच्या निरनिराळ्या अंगांचें काळ व जागा यांच्या अवकाशाप्रमाणें यथामति विवेचन केलें. आतां या शेवटल्या पुस्तकांत मथळ्यांत लिहिलेल्या विषयाचें प्रतिपादन करावयाचें आहे; परंतु या विषयाचें विवेचन करणें कांहीं स्वाभाविक व कांहीं आगंतुक कारणांनीं बरेंच अडचणीचें झालेले आहे.
  प्रथमतः मथळ्यांतील विषयविवेचन हें शास्त्राच्या तात्विक सिद्धांतांचें प्रत्यक्ष व्यवहाराला उपयोजन होय व हें करणें नेहमींच अवघड बिकट असतें. कारण अशा उपयोजनाला दुहरी ज्ञान लागतें. एक शास्त्राच्या तत्त्वांचें व सिद्धांतांचें पूर्ण ज्ञान व दुसरें ज्या परिस्थितीला या तत्त्वांचें  व सिद्धांतांचें उपयोजन करावयाचें त्या परिस्थितीचें पूर्णज्ञान. हें दुसरें ज्ञान निव्वळ व्यासंगानें, वाचनानें किंवा विचारानें येणारें नाहीं, तर त्याला अनुभव व प्रत्यक्ष व्यवहाराशीं संबंध लागतो व अशी ज्ञानाची जोडगोळी थोड्याच लोकांच्या हातीं असते.
  या विषयाचें विवेचन अडचणीचें होण्याचें दुसरें कारण यासंबंधींच्या माहितीचा अभाव. कारण हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थितीची परीक्षा करून त्यावर उपाययोजना करण्याचा हा विषय आहे व म्हणून हा रोग्याला औषध देण्यासारखा बिकट आहे. प्रथमतः रोगाची बरोबर चिकित्सा झाली पाहिजे; परंतु ही चिकित्सा बरोबर होण्यास रोग्याच्या