या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४९९] राज्य ईस्ट इंडिया कंपनीकडून निघून ब्रिटीश पार्लमेंटाकडे गेलें, अर्थात् ब्रिटिश साम्राज्यव्यवस्थेला निव्वळ राजकीय स्वरूप आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकीर्दीत कंपनीच्या हिंदुस्थानच्या राजव्यवस्थेला व्यापारी व राजकीय असें मिश्र स्वरूप होतें, या तीन पर्वापेकीं औद्योगिक दृष्टीनें पहिलें पर्व हें हिंदुस्थानच्या भरभरार्टीचें व सुस्थितीचें होतें, दुसरें पर्व हिंदुस्थानच्या अवनतीचें होतें व तिस-या पर्वांत पुनः औद्योगिक पुनर्घटना सुरू झाली; म्हणजे हिंदुस्थानच्या औद्योगिक गतिचक्राची अत्यंत नीचावस्था १०० वर्षांच्या पर्वात आली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं, या आमच्या विधानांची सत्यता पुढील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल. आतां हिंदुस्थानच्या औद्योगिक इतिहासाच्या प्रथम पर्वाचें अवलोकन करूं. या पर्वापूर्वी व या पर्वांमध्यें हिंदुस्थानांत कलाकौशल्याची व घरगुती उद्योगधंद्यांची उत्तम प्रगत झालेली होती ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे. तेव्हां हिंदुस्थानच्या सुबक मालाची सर्व जगभर ख्याति हाेती व हिंदुस्थानाला सुवर्णभूमि म्हणत असत. इट्ली देशांतील शहरें युगु हिंदुस्थानच्या व्यापारामुळे गबर झाला हाेती व पोर्तुगाल, स्पेन वगैरे अॅटलांटिक महासागरावरील राष्ट्रांचा सर्व प्रयत्न हिंदुस्थानचा नवा जलमार्ग शोधून काढून हा किफायतीचा व्यापार आपल्या ताब्यात आणण्याचा होता. कोलंबसानें जें नवें खंड शोधून काढलें तें हिंदुस्थान तर नसेलना अशा समजुतीवर त्याला त्यानें प्रथम हिंदुस्थान असें नांव दिलें. पुढें खराेखरीचें हिंदुस्थान सांपडल्यावर अमेरिकेस पश्चिम हिंदुस्थान म्हणू लागले. हिंदुस्थानांतून त्या काळीं पक्का कारागिरीचा माल देशाबाहेर जात असे. जातिभेदाच्या मुळाशीं श्रमविभागाचें एक तत्व असल्यामुळे हिंदुस्थानच्या औद्योगिक व्यवहाराला एक संघटित स्वरूप आलें हाेतें. प्रत्येक जातींच्या चालीरीति, राहणी, गरजा व वासना या ठरीव झालेल्या होत्या. लोकांच्या गरजा फार थोड्या होत्या व राहणी साधी होती; व या राहणीस लागणारी सर्व संपत्ति देशांतच उत्पन्न होत असे. हिंदुस्थान हा त्या काळीं पूर्ण स्वावलंबी व स्वयंपूर्ण असा देश होता, इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानाला परकी राष्ट्रांची मागणी भागविण्याचें सामर्थ्य होतें. हिंदुस्थानांतून कापसाचें कापड, लोकरीचें कापड, धातूची भांडीं, हस्तदंती सामान,