या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[500] गालीचे व इतर कलाकौशल्याची कामें युरोपांतील सर्व देशांत व इतरत्र बाहेर देशीं जात व बाहर देशांतून मुख्यतः सोनें-रुपें हिंदुस्थानांत येई. युरोपीयन राष्ट्रांनीं हिंदुस्थानचा नवा मार्ग शोधून काढला त्या वेळीं युरोप अजून कलाकौशल्याच्या कामात अगदी मागे होते. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार म्हणजे अमेरिकेंतून इंग्लंडमध्यें आलेलें सोनें-रुपें व कांहीं किरकोळ दुर्मिळ वस्तुंपैदा करून त्या गलबतांत भरून हिंदुस्थानांत आणावयाच्या. येथें आपल्या ठाण्याला विणकर व इतर कारागिर यांना बोलावून घेऊन त्यांना आगाऊपैसे देऊन त्यांचेकडून युरोपांत पसंत असलेला माल तयार करून घ्यावयाचा व तो माल युरोपांत नेऊन विकावयाचा व फायदा पदरांत टाकावयाचा हा होता. त्या काळीं हिंदुस्थानांत बहुजनसमाजामध्यें सुखशांति व समाधान नांदत असावें. कारण लिस्ट याने म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानांत धंद्यांची व उद्योगांची बहुविधता होती. सर्व लोकांना उपजीविकेचें साधन म्हणजे एक शेती असा तेव्हां प्रकार नव्हता. शिवाय देशामधल्या निरनिराळ्या राजेराजवाडयांचा कारागिरांना राजाश्रय होता. कारागिरीच्या मालाला परदेशांची मागणी होती, यामुळे सर्व कारागिरांना काम भरपूर मिळे. शिवाय मजुरी पदार्थाच्या किंमती या रूढीनें ठरल्यामुळे व्यापारांत किंवा उद्योगधंद्यांत चढाओढ नव्हती. प्रत्येक जातीचा मनुष्य आपला धंदा सुखासमाधानानें करी व त्याच्या मालाला गि-हाईक ठरीव असल्यामुळे व मालाच्या किंमतीही ठराविक असल्यामुळे त्याचें पोट भरण्यास पंचाईत पडत नसे, बाहेरदेशीं जो माल जाई त्याचे बदला माल इकडल्या लोकांना नको असे. कारण यांची रहाणी साधी असे. यामुळे नेहमींच्या राहणीपेक्षा फायदा राही तो दागदागिन्यांत किंवा सोन्यारुप्याच्या रूपानें ठेवण्याची पद्धती होती. शिवाय देशामध्ये अन्तःशांतता कमी असल्यामुळे मिळकतीला सुरक्षितता नव्हती म्हणून सोनंनाणें व दागदागिने पुरून ठेवण्याची पद्धतही फार प्रचलित होती. हिंदुस्थानांत नेहमीं पुष्कळ सोन रुपे गडप होत अस याचें कारण हेंच होय. अशी पुरलेली व घरांत असलेली सोन्यारुप्यांची संपत्ति येथें फार असल्यामुळे हिंदुस्थान फार सधन देश आहे असें परकीयांस वाटे. हिंदुस्थानावर ज्या हजारों स्वाऱ्या झाल्या त्यांमध्यें पुष्कळ संपत्ति लुटून नेली जात असे व कंपनी सरकारचे नोकरही अतोनात पैसा आपल्या देशीं परत नेत.