या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५१३]

आयातनिर्यात व्यापारावरून स्पष्टपणें दिसतही आहे. जो पक्ष हिंदुस्थानची ब्रिटिश अंमलांत सारखी भरभराट होत आहे असें ह्मणतो त्या पक्षाच्या ह्मणण्यामधील सत्यासत्य आतां निवडितां येईल. कारण वरील विवेचनावरून ब्रिटिश अंमलाचा पहिला शंभर वर्षांचा व दुसरा साठ वर्षांचा असे दोन भाग होतात. व या पर्वांमधील हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति व गति अगदीं भिन्न भिन्न आहें असें दिसून येईल. असो.

      या काळांतील सांपत्तिक स्थितींत क्रांति घडवून आणणारी दुसरी गोष्ट ह्मणजे सुधारलेली सुलभ व जलद दळणवळणाचीं साधनें. आगगाड्या, तारायंत्रें, पोस्ट ऑफिसें, सडका, रस्ते, व आगबोटी या सर्व साधनांचा झपाट्यानें या ६० वर्षांत हिंदुस्थानांत प्रसार झाला, तसेंच सुवेझचा कालवा झाल्यानेंही हिंदुस्थान व युरोप यांचा जास्त निकट संबंध येऊन त्याचा व्यापारावर परिणाम होऊं लागला. या सर्व साधनांचा संपत्तीच्या उत्पादनावर व एकंदर देशाच्या व्यापारावर व देशांतील पदाथाच्या किंमतीवर परिणाम झाल्याखेरीज़ राहिला नाहीं हें उघड आहे. उपभोग्य माल किंवा संपत्ति ही गि-हाईकांच्या हातीं पडेपर्यंतच्या सर्व क्रिया उत्पादनापैकीच आहेत असें धरलें म्हणजे या दळणवळणाच्या साधनांनी देशांतील सांपत्तिक उत्पत्तिच अप्रत्यक्षपणें वाढली असें म्हणणें प्राप्त आहे व या दळणवळणाच्या साधनांनींच देशाचा आयातनिर्गत व्यापार वाढला व हिंदुस्थानची सांपत्तिक भरभराट होत आहे हे म्हणणारा पक्ष या वाढत्या आयातीनिर्यातिकडेच विशेषतः बोंट दाखवितो.
      या काळांत तिसरी सांपत्तिक महत्वाची गोष्ट ह्मणजे हिंदुस्थानांत संपत्तीच्या व शेतकीच्या नव्या पिकाचे पुष्कळ नवे नवे प्रकार उद्यास आले ही होय. इंग्रजी राज्याच्या पूर्ण व स्थिर स्थापनेनंतर इंग्रजी व्यापारी व हिंदुस्थान सरकार यांचें लक्ष हिंदुस्थानांतील बिन लागवड केलेल्या जमिनीकडे जाऊन त्यांनी नव्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याचा उपक्रम केला. तद्नुरूप चहाची लागवड १८५१ मध्यें मुरूं झाली व आतां हिंदुस्थान चहा निर्यात करणारा एक महत्वाचा देश बनला आहे. कॉफीची प्रचंड शेती १८६० मध्यें मुरू झाली. त्याच वर्षीं निळीची प्रचंड शेतीं सुरु झाली. चहाप्रमाणें या दोन पिकांची सारखी भरभराट होत गेली नाहीं.

३३