या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५१७ ] असे कायदेकानू नव्हते; निकाल गांवांतल्या पोक्त माणसांनीं आपल्या व्यवहारचातुर्यानें द्यावयाचां असे. या पद्धतींत वकिलाची गरज नव्हती, कागदपत्रांची गरज नव्हती, पुराव्याची भानगड नव्हती. लोक साधेभोळे व देवावर भरंवसा ठेवणारे होते. तेव्हां बहुधां निकाल पंचास सहज लावतां येई. पुराव्याची अडचण असली तर गाईच्या शेपटीला हात लावून किंवा मारुतीपुढें शपथ घेऊन एका पक्षानें आपलें ह्मणणें खरें करण्याची तयारी दाखविल्यास दुसरा पक्ष त्यास तयार होई. ज्याप्रमाणें युरोपांत द्वंद्वयुद्धानें तंट्याचा निकाल जलदीनें लागे तशा त-हेची झटकाफटकी व बिन खर्चाची ही न्याय्यपद्धति होती. व गांवपंचाइतीचा किंवा कांहीं ठिकाणीं सरकारनें नेमलेल्या न्यायाधिशाचा निकाल एखाद्या पक्षास पसंत नच पडला तर हुजुरास म्हणजे मुख्य राजाकडे धांव घेण्याची प्रजेत मुभा असे. व तेथें त्याला नजराण्याचा खर्च पडे, हें खरें. तरी पण यापेक्षां दुसरा खर्च नसे. इंग्रजी न्यायपद्धति उत्तम तत्वावर बसविलेली खरी व सुधारलेल्या राज्यपद्धतीला अनुरूप खरी; परंतु ती पद्धति अज्ञानी, साध्याभोळ्या अशिक्षित प्रजेस निरुपयोगी होती इतकेंच नव्हे तर ती त्यांना पुष्कळ त-हेनें घातक झाली. कारण या न्यायपद्धतीनें आमच्या शेतकरी वर्गाची संपत्ति व जमिनीही दुस-याकडे गेल्या. हें कसें झालें हे खालील विवेचनावरून दिसून येईल. इंग्रजी कायद्याचें पहिलें तत्व म्हणजे ' कायद्याचें अज्ञान ही कांहीं न्यायापुढें सबब चालत नाहीं.' अर्थात प्रत्येक मनुष्याला कायदा ठाऊक आहे असें इंग्रजी कायदा गृहीत धरतो. परंतु भोळसर लोकांस अशा भानगडीचा कायदा कसा समजावा ? तेव्हां अपरिचित अशा कायदेकानूच्या तडाक्यांत वादीप्रतिवादीचा पूर्वीच्या प्रमाणें स्वतः निभाव लागणें दुरापास्त झाले. यामुळे या कायद्यानें वकीलवर्गाची जरुरी उत्पन्न झाली. व असा एक नवाच वर्ग इंग्रजी कायद्यानें अस्तित्वांत आला व या वर्गाची भली मोठी मिळकत शेतक-यांच्या संपत्तीतूनच प्रायः अाली. कारण हिंदुस्थानांतील बहुतेक दिवाणी खटले अगदीं लहान लहान रकमांचे असतात हे सर्वश्रुतच आहे, व ते शेतक-यांच्या कर्जाबद्दल असतात. पूर्वीच्या काळीं शेतक-यांस कर्जाची गरज लागली म्हणजे तो सावकाराकडून कर्ज काढी