या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५२३] होण्यास योग्य आहे. व त्याप्रमाणें हिंदुस्थानांत नवीन धंद्याचा प्रारंभ होऊं लागला आहे पण आतां खुल्या व्यापाराचें तत्व टाकून दिलें पाहिजे. कारण हल्लींच्या स्थितींत खुला व्यापार चालूं राहिला तर या नव्या बाल उद्योगांचा पूर्ण वाढलेल्या दुस-या देशाच्या उद्योगाच्या चढाओढींत टिकाव लागावयाचा नाहीं. तेव्हां अर्थशास्त्रदृष्ट्या या धंद्यांच्या वाढीकरितां सरकारनें व लोकांनी संरक्षणतत्वाचा होतां होईल तितका अवलंब केला पाहिजे. म्हणजे हिंदुस्थानच्या सद्यः सांपत्तिक स्थितीला संरक्षण तत्व अवश्यक आहे असें लिस्टच्या विवेचनाप्रमाणें ठरतें व तें सर्वांशीं खरें आहे अशी आमची समजूत आहे. कारण आमच्या शेतक-यांची सुधारणा दोन त-हांनीं करतां येण्यासारखी आहे. एक शेतकीवरील मारा कमी करून व दुसरी शेतकींत सुधारणा करून. शेतकीवरील मारा कमी होण्यास देशांत उद्योगविविधता वाढली पाहिजे व उद्योगविविधता वाढण्यास देशांत धंदे किफायतशीर होऊं लागले पाहिजेत. असें होण्यास त्यांना पूर्ण वाढलेल्या धंद्यांशीं टक्कर मारतां आली पाहिजे. परंतु हें या बालधंद्यांचें हातून होण्यास संरक्षण तत्वाचा अवलंब केला पाहिजे. परंतु हिंदुस्थानास जमाखर्ची स्वातंत्र्य मिळेतोंपर्यंत या उपायाचा अवलंब होणें अशक्य कोटीपैकीं आहे. म्हणून या उपायाचें जास्त विवेचन करण्याची जरूरी नाहीं. मात्र हिंदुस्थानास सध्यांच्या स्थितींत संरक्षण तत्वाचा जर दुजोरा मिळेल तर उद्योगधंद्याची वाढ़ हां हां ह्मणतां होईल यांत शंका नाहीं. आतां हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति सुधारण्यास अर्थशास्त्रांतील सिद्धांतास धरून असे शक्य उपाय कोणते यांचा विचार करावयाचा राहिला. पर्यायानें याचा विचार या ग्रंथाच्या तात्विक भागांत झालाच आहे. तेव्हां येथें त्यांचा फक्त नामनिर्देश व उल्लेख बस आहे. या ग्रंथाच्या तात्विक भागांत संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा सविस्तर विचार केलेला आहे. आतां देशांत संपत्ति वाढण्यास या कारणांची वाढ झाली पाहिजे हें उघड आहे व या संपत्तीच्या कारणांच्या वाढीस उत्तेजन देणें हाच संपत्ति वाढविण्याचा खरा उपाय होय. परंतु या कारणांचे दोन वर्ग आहेत. एक अमूर्त कारणें व एक मूर्त कारणें. मालमत्तेची सुरक्षितता व वासनांची वाढ हीं दोन्हीं कारणें