हे पान प्रमाणित केलेले आहे.

[५२५]

डोळा करील तर सरकारचा शेतकीची प्रगति घडवून आणण्याचा प्रयत्न व्यर्थ जाईल; कारण नवीन ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोंचणारच नाहीं ही गोष्ट लोकनायकांनीं सरकारच्या ध्यानांत आणून दिली पाहिजे. शेतकऱ्यांसंबंधीचा दुसरा प्रश्न त्यांच्या कर्जबाजारीपणाचा व त्यांच्या शेतकींत सुधारणा करण्याकरितां त्यांना स्वस्त व्याजानें कर्ज मिळवून देण्याचा आहे. हे दोन्ही प्रश्न सहकारी तत्व व सहकारी पेढ्याचें तत्व या दोन तत्वांनीं सुटण्यासारखे आहेत. व या बाबतींत उशीरानें कां होईना परंतु सरकारनें उपक्रम केला आहे व या दोन तत्वांचा सरकारनें व लोकांनीं होईल तितका प्रसार केला पाहिजे. परंतु हें होण्यासही शिक्षण पाहिजेच. आतां संपत्तीच्या वाढींचीं दोन कारणें राहिंलीं, एक भांडवल व दुसरें योजक. हिंदुस्थानांत भांडवलाची वाढ फारच सावकाश होते व येथेंच औद्योगिक स्रावाचा प्रश्न येतो. हिंदुस्थान देशाचीं राज्यसूत्रें विलायतसरकारच्या हातांत असल्यामुळें विलायतेस हिंदुस्थानास पैसे धाडावे लागतात. सरकारी नोकरांच्या पेन्शनाचे पैसे द्यावे लागतात. तसेंच लष्करी खर्चाकरितां पैसे द्यावे लागतात व विलायतेहून पुष्कळ कर्ज काढलें असल्यामुळें त्या कर्जाच्या व्याजाचे पैसे द्यावे लागतात. कर्जाच्या शिवाय हिंदुस्थानचा बराच व्यापार युरोपियनांच्या हातीं असल्यामुळें त्याच्या नफ्याच्या रूपानेंही बरेच पैसे हिंदुस्थानांतून जातात. यालाच हिंदी अर्थशास्त्रज्ञ औद्योगिक स्राव म्हणत आलेले आहेत.हे सर्व पैसे हिंदुस्थानांतून अगदीं उगाच जातात असें ह्मणण्याचा कोणाचा भाव नाहीं; प्रत्येकाचा कांहीं मोबदला हिंदी प्रजेस मिळतो. परंतु हा मोबदला अमूर्त स्वभावाचा आहे व यायोगें प्रत्यक्ष संपत्तीची वांटणी असमतेची होते व यामुळें शिल्लकेनें भांडवल वाढण्याचा वेग फार सावकाश होतो. हीच संपत्तीची वांटणी जर कमी असमतेची झाली असती तर भांडवलाची वाढ जास्त जोरानें झाली असती. इतकाच या स्रावाच्या उपपत्तीचा अर्थ आहे. तेव्हां या बाबतींत सरकारनें होतां होईल तों विलायतेंतील खर्च वाढवूं द्यावयाचा नाहीं येवढें धोरण ठेविलें ह्मणजे झालें. लोकांनीं मात्र या बाबतींत अजून पुष्कळ करण्यासारखें आहे. प्रथमतः संपत्ति पुरून ठेवण्याची पद्धति अजीबाद टाकून दिली पाहिजे, तसेच आपल्या शिल्लकेंतील पुष्कळ भाग उपभोग्य भांड-