या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७०]

 खर्च फार मोठा होतो; व त्यामुळे एकंदरींत कामाच्या दृष्टीनें खर्च फार वाढतो. हिंदुस्थानच्या मजुरदार लोकांमध्यें या गुणाचा अभावच आहे. येथल्या मजुरांमध्यें कुचरपणाचा व आळशीपणाचा अवगूण फार आहे, यामुळेच हिंदुस्थानांतील मजुरी इतकी स्वस्त आहे. कारण मजूरलोक जितके तास काम करतात त्या मानानें त्यांचे हातून काम मुळींच उरकत नाहीं. काम अळंटळं करण्याची व काम करतांना इकडे तिकडे रमण्याची त्यांना मोठी खोड आहे. यामुळे देखरेखीचा खर्च हिंदुस्थानांतील कामांवर फार वाढतो व म्हणून एकंदरींत खर्च जास्त येतो. हिंदुस्थानाइतकी स्वस्त मजुरी जगामध्यें दुस-या कोठेही नसतांना हिंदुस्थानाइतका रेलवेला दरमैलीं खर्च कोठेंच येत नाही, यावरून ही गोष्ट सिद्ध होते.

भाग पांचवा,
भांडवल,

 अर्थशास्त्रामध्यें भाडवलाच्या व्याख्यबद्दल व स्वरूपाबद्दल फार वाद माजून राहिलेला आहे. सामान्य व्यवहारांत व व्यापारांत शब्द नेहमी वापरण्यात येतो. भांडवल म्हणजे कोणत्याही धंद्याच्या सुरुवातीस लागणारा पैसा असा सामान्यतः अर्थ केला जातो; तसेंच ज्याच्या योगानें मनुष्याला वार्षिक उत्पन्न येतें तें त्या मनुष्याचें भांडवल असें गणलें जातें. हा सामान्य अर्थ अगदीं चूक आहे असें नाहीं. परंतु ज्याप्रमाणें संपत्ति म्हणजेच पैसा अशी सामान्य समजूत असते व ती कांहीं अंशी खरी असते. परंतु पैशाखेरीज संपत्तीचीं दुसरींही पुष्कळ रूपें असतात; त्याप्रमाणेंच प्रस्तुतची गोष्ट आहे. औद्योगिक समाजांत पैशाच्या रूपानें भांडवल मापतात व पुष्कळ अंशीं पैसा हा एक भांडवलाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे खरा; तरी भांडवल पैशाखेरीज दुस-याही स्वरूपाचें असतें व हीं सर्व स्वरूपें कोणतीं व त्या सर्वांमध्यें एखादा सामान्य गुण आहे किंवा नाहीं हें अर्थशास्त्रदृष्ट्या ठरवावयाचें आहे.