हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७८]

 व वस्तुस्थितीला धरून आहेत असें समजलें म्हणजे मिल्लच्या प्रमेयाचें प्रतिपादन करतां येतें. मिल्लच्या प्रमेयाचा अर्थ असा आहे कीं, कोणीही मनुष्य एखाद्या मालाला मागणी करण्याच्या योगानें श्रमाला मागणी करीत नाहीं ह्मणजे या त्याच्या कृत्यानें अधिक मजुरदारांना मजुरी मिळते असें नाहीं किंवा पूर्वी असलेल्या मजुरांना जास्त मजुरी मिळते असें नाहीं. तेव्हां मजुरांच्या हिताच्या दृष्टीनें प्रत्यक्ष मजुरींत पैसे खर्च करणें म्हणजेच त्यांच्या हिताची गोष्ट आहे. मागणीचा परिणाम फक्त देशांतील पूर्वीं अस्तित्वांत असलेलें भांडवल व श्रम कोणत्या धंद्यांत योजिले जावे हें ठरविण्याकडे होतो. त्याच्या योगानें श्रमाला किंवा मजुर लोकांना उत्तेजन दिलें असें होत नाहीं. उदाहरणार्थ, एखाद्या माणसानें शंभर रुपये मखमाल खरेदी करण्यांत घालविले किंवा आपल्या घराभोंवतीं बाग करण्यांत घालविले तर या पैशाच्या दोन प्रकारच्या विनियोगांत फरक काय? सामान्य समजूत अशी आहे कीं, दोहोंमध्यें फरक नाहीं. पहिल्या विनियोगांत मखमालीच्या कारखान्यांतील मजुरांस मजुरी जास्त मिळाली तर दुस-यांत बागवानास. व कामकऱ्यांस मजुरी जास्त मिळाली. परंतु मिल्लच्या मतें या दोन विनियोगांत जमीनअस्मानाचें अंतर आहे. १०० रुपयांची मखमाल घेतल्यानें मजुरांना जास्त मजुरी मिळत नाहीं, कारण मजुरांची मजुरी कारखानदारांकडून आधींच त्यांना मिळालेली असते. परंतु १०० रुपये बागेंत खर्च करण्याच्या योगानें मजूरदार लोकांच्या श्रमाला ही नवी मागणी उत्पन्न झाली, व म्हणून त्यांना उत्तेजन मिळालें. परंतु अशी शंका घेण्यांत येईल कीं, जर त्या माणसानें १०० रुपयांची मखमाल घेतली नाहीं तर कारखानदारांचें तितकेंच नुकसान होईल. व त्या योगानें मखमालीच्या कारखान्यांतील मजुरांना मजुरी कमी मिळेल. तेव्हां मकमालींत खर्च न करण्यानें या गृहस्थानें मजुरांना जास्त उत्तेजन दिलें असें होत नाहीं. परंतु याला मिल्लचें उत्तर असें आहे कीं, मखमालवाल्याचें नुकसान ती मखमाल मुळींच न खपली तर होईल. परंतु त्याचा माल एका मनुष्यानें घेण्याचें नाकारलें म्हणून पडून राहील अशांतला भाग नाहीं. मखमालवाल्याला मखमालीची मागणी हळूहळू कमी होत आहे असें दिसून आल्यास तो आपलें भांडवल दुस-या एखाद्या धंद्यांत

घालील. एवंच, मालाच्या मागणीच्या फरकानें देशाचें भांडवल कमी