या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग सहावा.
योजक अगर कारखानदार.

 या भागांत संपत्तीच्या उत्पत्तीच्या शेवटच्या कारणाचा विचार करावयाचा आहे. समाजाच्या व उद्योगधंद्याच्या उत्क्रांतीमध्यें हें कारण शेवटीं प्रादुर्भूत होतें. परंतु जरी तें मागाहून अस्तित्वांत येतें तरी त्याचें महत्त्व मात्र कमी नाहीं. उलट जसजसा समाज आधिभौतिक मार्गांत पुढें पाऊल टाकतो तसतसें या शेवटच्या कारणाचें महत्व अधिक वाढतें. समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्तीची उत्पत्ति बहुधा नसतेच म्हटलें तरी चालेल; व त्या वेळीं मनुष्याला आपल्या गरजा सृष्टीच्या फुकट देणग्यांनीं भागवितां येतात. म्हणजे या काळीं संपत्तीचें पहिलें कारणच प्रधानभूत असतें. पुढें त्याला मनुष्याच्या श्रमाची जोड लागते, व त्या श्रमाला थोंडेंसें प्राधान्य येतें. समाजामध्यें ज्ञानवृद्धि व संपत्तीची वृद्धि होऊन भांडवल उत्पन्न झालें म्हणजे श्रमपेक्षां भांडवलाचें पारडें वर जातें व अत्यंत सुधारलेल्या देशांत तर शेवटच्याचें म्हणजे योजकाचें अगर कारखानदाराचें महत्त्व जास्त वाढतें. कारण समाजामध्यें सृष्टीच्या शक्ति असतील; समाजांत श्रम करणारे लोकंही विपुल असतील व समाजांत इतस्ततः पडून राहिलेलें भांडवलही पुष्कळ असेल; परंतु या तीन कारणांपासून संपत्ति उत्पन्न करण्यास या सर्वांचा मिलाफ करणारा योजक पाहिजे व "योजकस्तत्र दुर्लभः" या न्यायानें योजकाची फार बाण असते. कारण अर्वाचीन काळीं आधिभौतिक शास्त्रांचे ज्ञान पुष्कळ वाढल्यामुळें व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष धंद्यांत व व्यवहारांत पुष्कळ उपयोग होऊं लागल्यामुळें प्रत्येक धंद्याला उपयोगी अशीं हजारों यंत्रें व नैसर्गिक शक्तीचीं उपकरणें प्रचारांत आलीं आहेत. यामुळें हल्लीं उद्योगधंदे घरगुती तऱ्हेचे राहिले नाहीत. तर त्यांना प्रचंड कारखान्याचें रूप आलें आहे, व हे प्रचंड कारखाने चालविणें हें एक स्वतंत्र व मह्त्वाचें उत्पादनाचें अंग झालेलें आहे.