या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भाग सातवा.
श्रमविभाग.

 अॅडम स्मिथनें आपल्या अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा प्रारंभ श्रमविभागाच्या तत्त्वाच्या विवेचनापासून केला आहे. कारण संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा विचार करतांना हें तत्व त्याचे ध्यानांत प्रथम आलें व त्याचा हा एक मोठा शोधच होता. शिवाय अर्थशास्त्रांतील आपल्यापूर्वी झालेल्या पंथापासून आपल्या पंथाचा निराळेपणा पुढें मांडण्याकरिता श्रम व श्रमविभागाचें तत्व यांनाच अॅडम स्मिथनें प्राधान्य दिले. त्याच्या वेळच्या दुसऱ्या ग्रंथकारांनीं व त्याच्यामागून झालेल्या ग्रंथकारांनीं या तत्त्वाला दुसरा पारिभाषिक शब्द योजण्याचा प्रयत्न केला. परंतु या तत्वाला अँडाम स्मिथनें दिलेलें 'श्रमविभाग' हेंच नांव सर्वसंमत होऊन प्रचारांत आले.
 'श्रमविभाग' या पदाचा अंडाम स्मिथनें संकुचितार्थानें उपयोग केलेला नाहीं, तर त्यानें तें पद फार व्यापक अर्थानें योजलेलें आहे. पुढील ग्रंथकारांनीं ज्याला श्रमसंयोग म्हटलें आहे त्याचाही अन्तर्भाव श्रमविभाग या व्यापक पदांत त्यानें केलेला आहे.
 'श्रमविभाग' या तत्वाचीं दोन अंगें आहेत. एक श्रमविभाग (सकुंचित अर्थाने) व दुसरें श्रमसंयोग; हीं दोन अंगे परस्परावलंबी व परस्परपूरक अशीच आहेत. एकाचा जितका प्रसार अगर विकास होतो तितकाच दुसऱ्याचाही होतो हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
 संकुचित अर्थाच्या श्रमविभागाचे तीन पोटभाग होतात; एक सामाजिक श्रमविभाग, दुसरा औद्योगिक श्रमविभाग व तिसरा स्थानिक श्रमविभाग.
 सामाजिक श्रमविभागाचें तत्व समाजाच्या प्रारंभापासून अमलांत येतें. मनुष्याच्या अगदीं रानटी स्थितींत प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा