या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८६]

आपण भागवीत असतो. शिकार आपण करावयाची; बाण व तिरकमठा आपणच तयार करावयाचा; मासे आपले आपणच धरावयाचे व जाळेंही आपणच करावयाचें; झोंपडीही आपणच बांधावयाची व थंडी निवारण करण्याकरितां कातडींही आपणच तयार करावयाचीं व आपण मिळवून आणलेल्या संपत्तीचें संरक्षण आपणच करावयाचें; अशा बहुविध प्रकारचा प्राथमिक स्थितींतील माणसाचा व्यवसाय असतो. परंतु या स्थितींतही बायका व पुरुष यांच्या कामांमध्यें पृथक्करण झालेलें असतेंच.घरातली कामें बायकांचीं व बाहेरचीं कामें पुरुषांची, हा पहिला श्रमविभाग होय. मनुष्य गुरेंढोरे बाळगून आपली उपजीविका करून राहूं लागल्यावर तर हा श्रमविभाग जास्तच दृढ होतो. दुहितृ हा संस्कृत शब्द या काळाचा द्योतक आहे. त्या काळीं मुलीचें काम दूध काढण्याचें होतें असें दिसतें. म्हणून या कामावरून ' दुहिता ' ' दूध काढणारी ' ह्मणजे मुलगी असा पुढें अर्थ झाला. परंतु पुढें मनुष्याच्या असें अनुभवास आलें कीं, एका माणसानें एकाच कामांत आपला सर्व वेळ व सर्व सामर्थ्य खर्च करणें हें त्याच्या व समाजाच्या दृष्टीनेंही फायद्याचें आहे. कारण या योगानें हीं कामें चांगलीं होऊन सगळ्यांच्या गरजा जास्त सुलभ रीतीनें भागविल्या जातात. अर्थात धंद्याचा हा श्रमविभाग समाजाच्या वाढीस व सुखास अत्यंत अवश्य अहे असें दिसून येतें. प्लेटोने हैंच श्रमविभागाचें तत्त्व समाजाच्या उत्पत्तीचें कारण म्हणुन दिलें आहे. धंद्याचें पृथक्करण हे तत्वही आर्यलोकांच्या जातिभेदाच्या मूळाशीं आहे. समाजाचे चार वर्ण हे मुख्य धंद्याचे पृथक्करण. एका वर्गानें समाजाच्या संरक्षणाचें काम हातीं घ्यावे एकाने समाजाचा धार्मिक व ज्ञानविषयक कार्यभाग हाती घ्यावा; राहिलेल्यांनी वरील तिन्ही वर्गांची सेवाचाकरी करून त्यांना आपआपल्या धंद्यांत पूर्ण लक्ष घालण्यास फुरसत द्यावी; हे चार मुख्य धंदे मनुष्यानें आपआपल्या गुणा प्रमाणें करावे. ही वर्णव्यवस्थेची कल्पना व उपपत्ति ह्मणजे श्रमविभागाचेच तत्व होय. या व्यवस्थेचें पुढें औयोगिक स्वरूप गौण हेऊन त्याच्या धार्मिक व सामाजिक स्वरूपाला प्राधान्य आलें ही गोष्ट निराळी. तेव्हां समाजाच्या गरजा वाढतात तसतसे निरानराळे धंदे वाढतात,