या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १०९

असतात. काही पक्षी लालसर, काही तांबूस असे असतात. त्यातच काही थोड्यांच्या शेपटाची दोन पिसे लांब तारेसारखी मागे आलेली असतात. हे पक्षीसुद्धा स्विफ्ट प्रमाणेच कधी झाडांवर न बसणारे असतात. मात्र ते तारांवरून, घराच्या भिंतीवरून व गच्चीवर बसतात व अगदी क्वचित् जमिनीवर पण बसतात. ही सर्व मंडळी पण उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेली. ही मात्र बरेच दिवस दिसतात व मग जी नाहीशी होतात, ती हिवाळा सरताना परतीच्या वाटेवर असली म्हणजे पुन्हा भेटतात. आपल्याकडे ह्यांनाही पाकोळीच म्हणतात असे वाटते. इंग्रजीत त्यांना ‘स्वालो' म्हणतात.
 हिवाळ्यातली ही भ्रमंती पाहिली म्हणजे कालिदासाच्या रघुदिग्विजयातील श्लोकांची आठवण होते. सूर्य परत तळपू लागला; इंद्रधनुष्ये नाहीशी झाली; निरभ्र आकाशात चंद्र प्रकाशू लागला; अगस्तीच्या उदयाबरोबर गढूळ पाणी निवळू लागले; नद्यांचे पूर ओसरू लागले; रस्त्यातला चिखल वाळू लागला, शरद ऋतू हिवाळा आल्याचे सांगत आला आणि त्याने काय केले तर रघूला चालू लागण्यास प्रोत्साहन दिले (यात्रायै चौदयामास).
 पावसाळा संपला म्हणजे जणू सर्व चरसृष्टीला चालू लागायची प्रेरणा मिळते. चरैवेति चरैवेति-“चालू लाग बाबा, जगायचे असेल तर चालत राहा, नाही तर मरशील”
 मार्गशीर्ष-पौषाच्या सुमारास मी एका पाहुण्याची वाट पाहात असते; पण तो नेहमी दिसतोच असे नाही. एक दिवस कॉलेजात बसल्याबसल्या खिडकीबाहेर पाहिले तर समोरच्याच झाडावर सोन्यासारखे काहीतरी लखलखत होते खिडकीशी जाते तो एक सोन्याचा पक्षी त्या झाडावरून उडाला व दुसऱ्या झाडावर बसला. ह्या पक्ष्याचे पंख नवीन उजाळा दिलेल्या साेन्यासारखे, लाल डोळ्यांच्या कडा काजळ घालावे तशा काळ्या व पंखांची कि काळ्या साटिनची. ह्या अद्भुत सौंदर्यदर्शनाने माझे हृदय फुलून आले. तो पक्षी दोनतीन दिवस दिसून नाहीसा झाला. पुढल्या वर्षी घरच्या व काॅलेजातल्या बागेत पण दिसला. त्याचे ‘गोल्डन-ओरिओल' हे इंग्रजी नाव पुस्तकात वाचून समजले, व कळले की हा पक्षी तुर्कस्थान, गिलगिट, अफगाणिस्तानांतून इकडे येतो, नंतर एका वर्षी वसंतऋतूत मी ओरिसात गेले असताना भल्या पहाटे पिऊऽऽ पिऊऽऽ असा पक्ष्याचा गोड आवाज ऐकून