या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / १३३

जर्द पिवळी अशा दोन रंगांच्या ओढण्या दिसत होत्या. किती तरी लांबून ते लाल व पिवळे ठिपके शेतात दिसत होते.
 ओरिसाच्या दाट अरण्यात जर्द काळसर हिरव्या पालवीच्या खाली सूर्याचे नाचणारे कवडसे. रानातील वळणावळणांनी जाणारी पाऊलवाट, शेजारच्या लहानशा झोपडीपुढे उभ्या असलेल्या जवळजवळ नागड्या बोंडो बायका व त्यांच्या गळ्यांतील बटबटीत मण्यांच्या माळा, त्यांचे सुरकुतलेले चेहरे, साफ गुळगुळीत हजामत केलेली डोकी, त्यांचे थोडे भेदरलेले, थोडे प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे लागलेले डोळे व त्यांच्या शेजारीच दारू पिऊन झिंगलेला, झुकांड्या जात असलेला, मला परत परत सलाम करणारा त्यांच्या घराचा मालक हे चित्र डोळ्यांपुढे येऊन उभे राहिले.
 नगर जिल्ह्यातल्या एका डोंगरावर आम्ही चढत होतो. सकाळचे दहासाडेदहाच झाले होते; पण ऊन मी म्हणत होते. डोंगरावरचे काळे कातळ चटकत होते. आमच्याबरोबर वाटाडे म्हणून वारकरी पंथाचे एक बुवा होते. डोंगरावरच्या गावाहून एक बाई व दोन-तीन पुरुष खाली उतरत होते. बुवांना पाहून ही मंडळी थांबली. ती बाई फाटक्या अंगाची, तरुण, पोरसवदा, हिरवे लुगडे नेसलेली होती. रंग काळा, चेहरा व अंग इतके रेखीव, की आम्ही आश्चर्याने स्तब्ध झालो. तिचे नाक रेखीव, जिवणी कातीव, हनुवटी नाजूक, डोळे पाणीदार पिंगट, दाट काळ्या सरळ भुवया व बांधा हिरव्या कळकाच्या काठीसारखा होता. जणू शेजारच्या काळ्या कातळातून कोरून काढलेली मूर्ती सजीव होऊन आम्हांपुढे उभी राहिली होती. वरचे निळे आकाश, खालचा खडकाळ प्रदेश, कडक उन्हात पसरलेल्या वेड्यावाकड्या लांब लांब सावल्या व ती रमणीय सावळी मूर्ती आठवताच लंडनच्या गारठ्यातसुद्धा माझ्या अंगात ऊब आल्यासारखे वाटले.
 इंग्लंडचे चित्रकार आपली सजीव-निर्जीव सृष्टी जिव्हाळ्याने चित्रात जिवंत करतात; पण माझ्या घरच्या सृष्टीला अजून कोणी चित्रकारच भेटत नाही. पाहावे त्या चित्रात गोऱ्या, लुसलुशित, गुलाबी चोळ्यांच्या व फिक्या रंगांच्या साड्या नेसलेल्या बायका विलायती फुलांचे गुच्छ घेऊन हसत असतात किंवा विलायती वाद्ये वाजवितात किंवा स्विट्झर्लंडमधील सरोवराच्या काठी बसून स्वेटर विणीत असतात. त्यांच्या तोंडाला कधी त्यांच्या आकाशातला सूर्यप्रकाश भेटलेलाच नसतो. रणरण ऊन व गार