या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६ / भोवरा

आकाश, अशा रंगमय सृष्टीत मी रमते. माझ्याबरोबर त्याच बागेत मधमाश्या मध गोळा करीत हिंडतात. त्यांची सृष्टी पण रंगमयच आहे, पण मला जे तांबडे दिसते ते त्यांना बिनरंगी दिसते, मला जे पांढरे दिसते ते त्यांना हिरवट पिवळे व निळसर दिसते. मला निळे दिसते ते त्यांना पांढुरके दिसते व मला न दिसणारे काही रंग त्यांना दृष्टिगोचर होतात. प्रकाशलहरींतील काही भाग माझ्या डोळ्यांना दिसतो, काही मधमाशीला दिसतो व त्याचा परिणाम म्हणजे माझी व तिची सृष्टी अगदी निराळी असते. ह्यातली सत्य कोणती?
 जी गोष्ट प्रकाशलहरींची तीच ध्वनिलहरींची. माझ्या कानांना ऐकू न येणाऱ्या ध्वनिलहरी इतर प्राण्यांना ऐकू येतात. कुत्रा ज्या गंधमय विश्वात वावरत असतो, त्यातील एक-शतांश गंध आपल्या नाकाला ओळखू येत नाही.
 शिवाय मला जी ज्ञानेंद्रिये आहेत, त्यांशिवाय इतरही ज्ञानेद्रिये जीवसृष्टीत आहेत व ती त्या त्या प्राण्यांना सृष्टीचे मला अज्ञात व अज्ञेय असे एक निराळेच अद्भुत दर्शन घडवीत असतील. अशा अनंत रूपातील अमकेच रूप सत्य असे म्हणता येईल का? अगदी हाच विचार जुन्या कवींच्याही मनात आला आला असला पाहिजे. मनुष्याला सर्व सत्य सापडणे व कळणे शक्यच नाही; मग ते कोणाला कळेल? सत्य स्वरूप ब्रह्माचे वर्णन म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. “विश्वतः चक्षुः उत विश्वतो मुखो विधता बाहुः उत विश्वतस्मात्।” असे हे भव्य वर्णन आहे. जो सर्वांच्या डोळ्यांनी पाहतो, सर्वांच्या अवयवांनी क्रिया करतो. तोच सर्व सत्यमय आहे. तो मुंगीच्या चिमुकल्या पायाने व राक्षसाच्या मोठ्या पायाने चालतो. माणसाच्या व मधमाशीच्याही डोळ्यांनी पाहतो. पायदळी चिरडल्या जाणाऱ्या मुंगीचे दु:ख व हिरोशिमामध्ये मेलेल्या हजारो मानवांचे दु:ख ही दोन्ही त्याला होतात. अशाच कोणाला सत्य- अंतिम सत्य प्रतीत होणार. इतर सर्वांचे- शास्त्रज्ञांचे असो, राजकारणी पुरुषांचे असो वा लहान मुलांचे असो-सत्य नेहमी अपुरे, एकांगी व सापेक्षच राहणार.

१९५४