या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४८ / भोवरा

जायला रेल्वे टाइमटेबलाप्रमाणे ४८ तासांच्या वर लागतात, पण गाडीला कित्येक तास ते एक-एक दोन-दोन दिवससुद्धा उशीर लागतो. विमानाने तीन ते साडेतीन तासांत गौहाटीला पोचता येते. सरकारी अधिकारी, बऱ्याच ऑफिसातले कारकून व शंभराशंभराच्या टोळ्यांनी मळ्यातील मजूर विमानाने आसामात जात होते. एवढे मजूर अगदी तातडीने विमानाने पाठवणे कसे परवडते, ते काही लक्षात येईना. आसामातले मळे गौहाटीच्या उत्तरेकडे सीमेपर्यंत पसरले आहेत. तेथपर्यंत मजुरांचे कुटुंब पोचावयाचे म्हणजे ४-५ दिवसांचा प्रवासखर्च व खाण्यापिण्याचा खर्चही करावा लागतो. तेव्हा कदाचित ३ ते ५ तासांत पोचणारी विमाने परवडत असतील. का कोण जाणे, पण आगगाडीच्या प्रवासात ज्याप्रमाणे निरनिराळ्या परिस्थितीतली माणसे व सामानाचे ढीग दिसतात तसे मला आसामच्या विमानाच्या फेरीत दिसले.
 विमानाचा पहिला प्रवास अगदी सपाट पाणथळ मैदानातून होता. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पाॅद्दा (पद्मा) ऊर्फ मेघना नदीचा विस्तीर्ण पट्टा व त्या काठाची भातशेती. कलकत्ता सोडलं म्हणजे पूर्व पाकिस्तानावरून विमान जाते ते आगरताळ्याला अर्धा-पाऊण तास थांबते. विमानतळ उदास, निर्मनुष्य असा वाटला. हा भारताचा भाग असा आहे का त्याच्या जवळजवळ सर्व बाजूंनी पाकिस्तान आहे. भारताशी व्यवहार विमानाने. फारच थोड्या लोकांना ते साध्य होते. येथली एक बाई मला ग्वाल्हेरला भेटली होती. अननस आवडीने खाताना मला पाहून ती म्हणाली होती, “आमच्याकडे या, रुपयाला २५ अननस मिळतात.” मी म्हटले "कलकत्त्याला का पाठवीत नाही? ती म्हणाली होती, “इतक्या स्वस्त फळांसाठी लागणारे विमानभाडे परवडत नाही. आगगाडीने माल वेळेवर न कुजता पोचण्याची शाश्वती नाही. विमानातून डोकावताना कुठे अननसाचा लागवड दृष्टीस पडली नव्हती. भात-शेते, नारळ आणि सुपारी. पूर्व पाकिस्तानातून जाताना तागाची लागवड दिसेलसे वाटले होते. पण तीहीविमानातून ओळखता आली नाही.
 आसामात आलो तो पोटपट्टे आवळण्याची सूचना आली. डोंगराळ भाग लागला होता, खालचा देखावा भव्य पण जरा भयानकच होता. तुटलेल्या डोंगरांच्या माथ्यांवर उभ्या भिंती दिसत होत्या. त्यांच्या