या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / १४९

अर्धवर्तुळातून एक प्रवाह वाहात होता. हा प्रदेश ओलांडल्यावर लगेच दुसऱ्या बाजूला डोंगरांचे उतार सौम्य होते व त्यांवर व माथ्यांवर भाजावळ चाललेली दिसली. लक्षात आले की हा विभाग गारो डोंगरांचा असणार. ह्या डोंगरांच्या माथ्यावर व उत्तरेकडच्या उतरणीवर गारो लोकांची वस्ती आहे दक्षिणेकडे कडे तुटलेले असल्यामुळे घरे करून शेती करणे अशक्य म्हणून जवळजवळ वस्ती नाहीच. ह्या डोंगरावरून जाताना विमानाला म्हणे हटकून गचके बसतात. तेवढी पाच मिनिटे गेली म्हणजे विमान परत स्थिरावते. कलकत्त्याला व आसामला बर्यऱ्याच लोकांना विचारले...' पण ह्या प्रकाराचे कारण कोणाला सांगता आले नाही. आणि आसामची आठवण झाली की माझे मन परत परत गारो टेकड्यांशी गचके घेत राहते.
 हा हा म्हणता गौहाटी आले. मला न्यायला कोणी बाई आल्या होत्या त्यांनी मला ब्रह्मपुत्रेच्या तीरावर बांधलेल्या सुंदर आरामघरात नेऊन पोचवले. फराळाचे मागवले व मग दोघींनी मिळून माझ्या पुढच्या दोन दिवसांचा कार्यक्रम आखला. मला शब्द व त्यांचे अर्थ ह्यांचे जवळजवळ वेड आहे. आसामपासून बंगाल, ओरिसा वगैरे भागांत ‘हाट' किंवा 'हाटी' प्रत्यय असलेली गावांची नावे बरीच आहेत. हाट शब्द ‘बाजार' ह्या अर्थी असेल किंवा 'घाट' शब्दाचेही रूपांतर असेल. मी विचारले, “गौहाटी म्हणजे गुरांचा बाजार भरण्याचे ठिकाण का हो?" त्या बाईही सुदैवाने शब्दांच्या अर्थावर विचार करणाऱ्या निघाल्या. त्यांचे म्हणणे पडले की, गौहाटी हा शब्द गुवां किंवा गुआं-हाटी यांचे रूप आहे. गुआं म्हणजे आसामी भाषेत सुपारी. पूर्वी येथे सुपारीचा मोठा बाजार भरत असे.” मला ही कल्पना फारच आवडली. कारण काही दिवसांपूर्वीच ओरिसामधील शेतकऱ्यांच्या लग्नविधीवर वाचीत असताना ‘गुआंफोड' शब्द आला होता व त्याचा अर्थ समजत नाही म्हणून लेखकाने टीप दिली होती. माझ्या मनात जाचणारे शल्य एकदम नाहीसे झाले. लग्नाची सुपारी फोडण्याचा समारंभ असतो त्याचे नाव ‘गुवां फोड' असणार. त्या वेळी माझे अगदी समाधान झाले. आता वाटेत जास्त चौकशी करायला हवी होती. गोघाटी कशावरून नसेल? ब्रह्मपुत्रा पार होण्याचे ठिकाण तेथून जवळ असेल तर गुरे हाकून नदीपार करण्याचे ठिकाणही हे असू शकेल.
 मार्चचे शेवटचे दिवस किंवा एप्रिलचे सुरुवातीचे दिवस असावेत.