या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७

     भटके

 घर अगदी निःशब्द होते. जिन्यावर कुणाची पावले धाड धाड वाजत नव्हती, माडीवर कुणाची हालचाल ऐकू येत नव्हती, वर्तमानपत्राची खसखस नव्हती की टाइपरायटरचे टक् टक् नव्हते. मी माझ्या आवडत्या हिरव्या खोलीत पडले होते... भिंतीवरच्या फोटोकडे पाहात. पोरगा हजार मैलांवर गेलेला.. तो कसला इतक्यात दिसणार? केवढे अंतर आहे! पण ह्या अंतरापेक्षाही आता मोठे अंतर पडले आहे- एका पिढीचे, एका जन्माचे. इतके दिवस हे त्याचे घर होते- आता तो दुसरे घर करणार. पोरीसारखाच. ती नाही का जवळ असून दूरच? मीच नाही का तिला दूर केले? अगदी मोठा समारंभ करून? आता का कुरकूर? ती दोघे काही कारणाने गेली, पण बाकीच्यांना काही तसे कारण नव्हते. एकाला कंटाळा आला म्हणून- एक प्रवासाला म्हणून- पण बाहेर जायला कारण कशाला?
 कित्येक जिप्सी ह्या घरात अगदी उघडपणे वावरतात.
 काही मला आई म्हणतात, एकजण मला बायको म्हणतो.
 जमतात, हसतात. हसवतात. निघून जातात, नि रडवतात.
 परत जमतील, परत हसवतील, परत जातील, परत रडवतील.
  माझ्या घराच्या थडग्यात मला गाडून जातील.
 सोबतीला आठवणींचा पाचोळा नि प्रतीक्षेची हुरहूर.
 ह्या भटक्यांना जखडून कसं टाकू?
 कोणत्या दाव्यानं बांधून ठेवू?
 गायी म्हशी, उंटघोडे, शेळ्यामेंढ्या, अगदी हत्तीसुद्धा बांधून घातले. पण ह्यांना नाही बांधता येत.