या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६० / भोवरा

 "नाही रे. त्या गेल्या म्हणून एकटं वाटलं. निदान धाकटीनं तरी जायला नको होतं."
 "ते का? सुटीत एकटी घरी राहून तिला कंटाळा आला. तिच्या बरोबरच कोणी नाही. गेली ताईबरोबर."
 धड उत्तर सुचेना. म्हणणे बिनतोड होते. पण मग आठवण झाली. सुटी झाल्यापासून काडीचं वाचन नाही की अभ्यास नाही. नुसती उनाडते आहे. घरी राहून थोड वाचन झालं असतं." पण हा साळसूदपणा उपयोगी पडला नाही. लगेच उत्तर मिळाले.
 “बी.ए.ची परीक्षा झाली तेव्हा तू नाही का सबंध सुटी पोहण्यात न् टेनिस खेळण्यात घालविलीस? तेव्हा किती वाचलं होतंस सुटीत? जा, जाऊन नीज. उगीच काही तरी वेड घेऊन बसतेस."
 “ही-ही-ही-ही-खी-खी-खी-खी! कशी जिरली! कशी जिरली !” मी दचकून पाहिले, मघाशी मुंड्या मुरगळून मारून टाकलेले सगळे जिप्सी परत आले होते. माझ्याभोवती नाचत होते. दात विचकून हसत होते.
 भितीवर आईचा नि सासूबाईंचा फोटो समोरासमोर लावलेले होते. भावजी हजारो मैलांवर नोकरीला होते. ते आले म्हणजे सासूबाईंचा आनंदते जाऊ लागले की सासूबाईंची होणारी तडफड आठवली. आता जाऊबाईंचे मन मुले लांब गेली म्हणून तसेच तडफडते.
 मी कपाळाला हात लावला. पंढरपूरला विठोबाच्या पायांवर डोके ठेवले, तेव्हा त्याचे पाषाणाचे गार गार पाय कपाळाला लागले. तो स्पर्श आठवला. बायका पंढरपूरला का जातात? घरातले सगळे भटके लांब जातात पण विठोबा मात्र न हालता, न चालता शतकानुशतके तेथेच उभा आहे. जन्मभर भटकणाऱ्या, कोणाच्या हाती न सापडणाऱ्या कृष्णाला येथे दोन विटांवर डांबून ठेवले आहे. सगळ्यांचे सैरावैरा धावणारे जीव, प्रिय जनांचा निरंतर, न संपणारा पाठलाग या दोन पायांशी स्थिरावतो. एकक दैवत एकेका इच्छेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेले असते ना? मग विठोबाच अठ्ठावीस युगे खडे राहिलेले ध्यान खात्रीने त्या पिरामिडमधल्या बायांना निर्माण केलेले असणार...
 बायांनीच काय म्हणून? पुरुषच फक्त भटके असतात? तू त्यांतलीच. आईच्या डोळ्यांकडे पाहिले. ती काही रागाने पाहात नव्हती; पण चित्रात