या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १६१



ती थोडी गंभीरच दिसत होती. मला एक प्रसंग आठवला-एक संभाषण आठवले. पुण्याच्या शाळेतून मी मोठ्या आनंदाने घरी जायला निघाले होते. प्रवासाचा प्रत्येक क्षण नवं नवं पाहण्यात गेला होता. दिवसा खिडकीजवळ बसून पळणाच्या सृष्टीचा चित्रपट पाहायचा, रात्री जुन्या काळच्या दुसऱ्या वर्गाच्या प्रशस्त बाकावर, आगगाडीच्या चाकांचा मधुर खडखडाट ऐकत, डब्याच्या मजेदार हालण्याबरोबर हालत अधूनमधून जागं होत झोपी जायचं. हा प्रवास झाल्यावर तीन दिवस बोट, मग रंगूनमधले दोन स्वप्नमय दिवस. मग परत आगगाडी.
 आगगाडी सागाच्या जंगलातून जात होती. मोठ्या मोठ्या पानांच्या सरळसोट झाडांची भिंत होती. कुजलेल्या पाचोळ्याचा वास येत होता. खिडकीबाहेर पाहावेसे वाटेना, इतकी कंटाळवाणी वाटली ती झाडी. पण मग गाडी रानाबाहेर आली व आम्ही एकदाचे मिंजानला पोचलो. घरी आई व अजूनपर्यंत न पाहिलेला एक गोड गोड भाऊ! केवढा मोठा दुमजली प्रशस्त बगला. पूर आला म्हणजे वरच्या मजल्यावरून इरावतीचे पाणी दिसत असे. पण मला नवल वाटे ते निराळेच. ह्या बंगल्याला कुठे दगडविटांचा स्पर्श नव्हता. सारे काम लाकडाचे व बांबूंचे, लाकडाचे उंच खांब, लाकडी आडव्या तुळया, वर लाकडी कैघ्या व त्यांवर लाकडी कौले होती. जमीन लाकडाची तर भिंती होत्या दुहेरी चटयांच्या. जोराचे वादळ आले की भिंती आतबाहेर व्हायच्या व अधूनमधून होणाऱ्या धरणीकंपात संबंध घर हाले पण मोडत नसे. लहानपणी पाहिलेल्या पण मध्ये पुण्याच्या शाळेत विसर पडलेल्या ह्या जगाची परत नव्याने ओळख करून घेताना मी अगदी आनंदात बुडून गेले होते. पण हळूहळू मला कंटाळा येऊ लागला. माझ्या बरोबरीचे, माझे खेळगडी असलेले दोघे भाऊ हिंदुस्थानात होते. नवा भाऊ छान खरा पण भारीच लहान. मला परत हुजूरपागेची आठवण होऊ लागली. वर्गातील मुली परत भेटाव्या म्हणून उत्सुकता लागली. मी बाबांना विचारले,
 “परत शाळेत कधी जायचं?" तर ते म्हणाले, “अशी काय लौकर लौकर रजा मिळते वाटतं? जाऊ दोन तीन वर्षांनी”
 उत्तर ऐकून मी सुन्न झाले. दिवसेंदिवस असा कंटाळा वाढत चालला! तो सुंदर बंगला, ती मोठी बाग, मला तुरुंगासारखे वाटू लागले. यातून सुटका कशी होणार या चिंतेत मी पडले. पण बाबांचे अचानक काम निघाले