या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६६ / भोवरा

त्रावणकोर येथे हत्तीला मिळणारी वागणूक व कोठे हा द्वेष, हे मनात आल्याखेरीज राहिले नाही. आसाम, त्रावणकोर भौगोलिकदृष्ट्या हिंदुस्तानची दोन टोके खरी, पण दोन्हीकडच्या लोकांच्या मनातले अंतर दोन हजार मैलांपेक्षाही कितीतरी जास्त वाटते.
 असाच फरक मी ओरिसाहून राजपुतान्यात आले तेव्हा जाणवला. परत तेच शब्द मनात उमटले- दोन टोकं!
 पश्चिम ओरिसाची घनदाट अरण्ये, पूर्व ओरिसाची हिरवीगार भातशेती, सगळीकडे भरून राहिलेले पाणी आणि त्यात उमललेली असंख्य कमळे हे पाहताना दृष्टी निवत होती. चिल्का सरोवराइतके रमणीय स्थान क्वचितच दृष्टीस पडते; पण त्याच चिल्का सरोवराकाठी एका खेडेगावात २५ टक्के प्रजा महारोगाने पछाडलेली दिसली. जगन्नाथ मंदिराच्या भव्य पटांगणात हत्तीरोग झालेले भिकारी इतके बसले होते, की नको ते देवदर्शन, नको ती प्रदक्षिणा, असे आम्हांला झाले. ओरिसामध्ये, विशेषतः किनाऱ्याच्या भागात, शेतकरी दारिद्याने गांजलेला, अंगावर धड वस्त्र नसलेला; स्त्रिया अंगाभोवती काही तरी, एका काळी पांढरे असलेले पण आता काळे मिच्च झालेले वस्त्र अगदी कलाहीनपणे गुंडाळतात. अशोकाची झाडे उंचच्या उंच वाढलेली सर्वत्र दिसायची. त्यांचे बंधे दोन माणसांच्या वावेत मावणार नाहीत इतकाले जाड होते. पुन्नागाची (उंडीची) हिरवी तकतकीत झाडे सुंदर पांढऱ्या शुभ्र फुलांनी डवरली होती. निसर्ग समृद्ध होता. पण माणसं रोग, दारिद्य, अज्ञान ह्यांनी पिडलेली होती.
 पश्चिम राजपुतान्यात आल्याबरोबर तिथल्या रणरणत्या उन्हाने डोळे उघडू नयेत असे वाटले. पाहावे तिकडे उन्हात चमकणारी वाळू. कुठे काही वृक्ष नि शेती दिसलीच, तर त्याने डोळ्यांना बरं वाटायच्याऐवजी त्या बिचाऱ्या झाडांचीच कीव वाटे. राजपुतान्यांतून उत्तर गुजरातमध्ये गेल तेथेही तोच प्रकार. आम्ही जेवून उठल्यावर गड्याने भांडी घासून आणली. तो प्रकार पाहून तर मी अगदी थक्कच झाले. ताटे, वाट्या, जळकी भांडी... सगळी वाळू घासून लखलखीत करून आणली होती. त्यांना पाण्याचा स्पर्शसुद्धा झाला नव्हता. गावातल्या एकुलत्या एका विहिरीला जेमतेम पिण्यापुरते पाणी होते. तो भांडी घासायला कसले पाणी वापरणार? पण ह्या मुलुखात डास नाही, माशी नाही, रोगराई अतिशय