या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १७३

 "मग का लिहिते आहेस? संपादकांना 'नाही' म्हणून स्पष्ट सांग. एवढी भीड कशाला? बाकीची कामं तरी होतील."
 "संपादकांच्या भिडेने नाही लिहीत; आणि हे लिहिले नाही म्हणून दुसरी कामे होतील असे थोडेच आहे? एकदा वाटतं, काही लिहावं पण त्याचाही कंटाळा येतो. लिहिलं नाही तर झोप येणार नाही- मनातलं कागदावर उतरलंच पाहिजे अशी परिस्थिती झाल्याशिवाय लिहूच नये; असं मला वाटतं म्हणून उगीच बसले आहे."
 "अशी कापूस पिंजत बसू नकोस. काही तरी कर."
  “बरं"

०००

 निघायचं निघायचं म्हणून सकाळपासून सामान बांधून बसलो होतो. पण ट्रक आली रात्री नऊ वाजता. ट्रकबरोबर जंगलातला एक छोटासा अधिकारी पण होता. तो म्हणाला, “काय करावं, सकाळपासून वाट पाहात होतो. संध्याकाळी टूक लाकडं भरून आला. तो खाली केला, ड्रायव्हरचं जेवण झालं, तो ही वेळ आली." मी म्हटले, “चिंता नाही, आमची तयारी आहे." पाच मिनिटांत सामान आत भरलं, गाद्या अर्धवट पसरल्या व चांगले हातपाय पसरून बसलो... बसलो कसले, रेललो. आमचे बहुतेक काम जंगलात चालणार होते व जंगलाच्या मुख्य अधिकाऱ्याने जंगलखात्याच्या टूक रिकाम्या असतील तेव्हा वापरण्याची आम्हांला परवानगी दिली होती. महिनाभर होणाऱ्या प्रवासातील हा पहिलाच प्रवास. जंगलातून रात्रीच्या प्रवासाची मोठी मौज असते, आणि त्यातूनही वरून उघड्या असलेल्या ट्रकमध्ये रेलून, अर्धवट निजून प्रवास तर फारच रम्य हे आम्हांला सर्वांना पटले. झाडांच्या भिंतींतून प्रवास चालला होता. झाडे वाऱ्याने हालली की काळ्या भिंतीला भोके पडत व त्यांतून आकाश दिसे. वरती निरभ्र आकाशाच्या धांदोटीत तारे चमकत होते. झाडे उंच असली की वरच्या प्रकाशाचा पट्टा नाहीसा होई व बोगद्यात प्रवास केल्यासारखा वाटे. प्रवासाच्या वाटेवर कळकांची बेटे होती. त्यांच्या पानांची हालती झालर आकाशाच्या पट्टीला अधूनमधून लागे व काळ्या पण प्रकाशमय अवकाशावर पानांची गडद वेलपत्ती उठून दिसे. थोडा वेळ डोळा लागे. जागे होऊन वरती पाहावे तो पहिल्यांदा पाहिलेले नक्षत्र कललेले दिसे व नवे