या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७८ / भोवरा

पोन्नम्पेटच्या बंगल्यात जाणार होती. आम्ही काम झाले की तेथे भेटायचे ठरले होते. सकाळी दहाच्या सुमारास चांगले सहा मैल चालून पोन्नम्पेटला पोचलो, तो कमल आपली एका झाडाखाली लांब तोंड करून बसलेली. बंगला म्हणे आम्हांला मिळणार नाही. मी तावातावाने बंगल्याकडे गेले. तेथील माणसाचे आपले एक म्हणणे, “जंगलच्या अधिकाऱ्याला मी जाणत नाही. मिनिस्टरची चिठी असल्यास बंगला उघडतो." आता काय करावे ? मिनिस्टरला आम्ही भेटलो होतो. त्याने परवानगी पण दिली होती. पण आम्ही पत्र घेतले नव्हते. शेवटी बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून रस्त्यावरच्या एका सरकारी चाळीत एक खोली मिळाली. खोली झाडली, मुलांनी पाणी आणले. बसायला सतरंजी पसरायला घेतली तो कमल म्हणाली, “काकू, लुगडे कसे फाटले?" मी पाहते तो पुढेच सबंध वरपासून खालपर्यंत फाटून खाली लोंबत होते. मी बंगल्यात तशीच गेले होते, अधिकाऱ्यांना तशीच भेटले होते. पोन्नम्पेटच्या रस्त्यांतून तशीच भटकले होते, फार काय, सहा मैल तशीच चालत आले होते. मी मटकन खाली बसले. लहान लहान गोष्टींचा मला छडा लागला. तो बंगल्यातला नोकर असा चमत्कारिक का बघत होता. त्या अधिकाऱ्याच्या चपराशाने आत येण्यास बंदी का केली? मी इंग्लिश बाेलू लागून कोण हे सांगितल्यावर तो अधिकारी चकित कसा झाला? एक ना दोन, गेल्या दोन तासांची चित्रे माझ्या डोळ्यांपुढून गेली. मी परत माझ्या लक्तराकडे पाहिले. सकाळच्या खेड्यातून बाहेर पडून रस्त्याला लागून काही तरी चिरल्याचा आवाज झाला तेव्हाच बहतेक लुगडे फाटले असले पाहिजे. आम्ही अंतर काटायचे म्हणून भराभर चालत होतो हातात रक्ताच्या नमुन्यांची पेटी- लक्ष गेले नाही. मी लुगडे बदलले. पण पुढचे दोन दिवस पोन्नम्पेटच्या रस्त्यातून जाताना वर मान करून मला चालवले नाही.
 हत्तीचे डॉक्टर आम्हांला मधूनमधून भेटत असत. बऱ्याचदा त्यांनी आमच्याकडे मुक्काम केला. आमच्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे त्या रमणीय सदानंदी प्रदेशात हा डॉक्टर तेवढा एक कायम कष्टी दिसायचा. आम्ही चौकशी केली, तर कळले की त्याला बायकामुले आहेत संसारही छान चालला होता. मग त्या माणसाचे दु:ख तरी काय? शेवटी एकदा न राहवून नंदू त्यांना म्हणाला, “क्षमा करा, डॉक्टर,तुम्ही नेहमी काळजीत दिसता ते का बरं?"