हे पान प्रमाणित केलेले आहे.

३० / भोवरा

पर्वताच्या खालच्या उतरणी व सर्वांच्यावर चमचमणारे, स्वच्छ निळे आकाश डोळ्यांत साठवले. फोटो काढता काढता भराभर ढग येऊन समोरचे दृश्य नाहीसे झाले. अधूनमधून एखादा पर्वत दिसे; पण चित्रांतला बारकावा नाहीसा झाला. आणखी फोटो काढणे शक्य नव्हते, म्हणून कॅमेरा बंद केला.
 “आपले फोटो काढून झाले; आता ज्या स्थानी आलात, त्याचा आदर करणे योग्य नाही का?" आमच्याबरोबरच्या पंड्याने विचारले. “ठीक आहे; पण काय तुमचे विधी असतील ते लौकर आटपा; आम्हांला पुढे दहा मैलांची चाल आहे.” “चला तर मग माझ्याबरोबर; आधी कुंडात हातपाय धुऊन शुद्ध होऊ" जाताजाता त्याने ताजी पुरीभाजी करण्याचा निरोप घराशेजारच्या दुकानदाराला सांगितला व आम्ही कुंडाशी गेलो. हातपाय, तोंड धुतले तर कळा लागण्याइतके पाणी थंड होते. तरी भाविक लोक स्नान करीत होते व स्नान करून गारठलेल्या यजमानांना हात धरून पंडे लोक रसरसलेल्या शेगड्यांशी नेऊन बसवीत होते. पंड्याने संकल्प सांगितला व आम्ही दक्षिणा देऊन देवळाच्या वाटेला लागलो.
 पंड्याने सांगितल्याप्रमाणे देवांच्या पुढे पैसापैसा टाकीत मुख्य देवळात जाऊन दर्शन केले. देऊळ अगदी लहान होते. बाहेर चौथरा होता; त्यावर येऊन उभे राहिलो व परत एकदा चौफेर नजर टाकली. उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा पसरल्या होत्या; दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, पूर्वेकडे, पहावे तिकडे पर्वतच पर्वत, अगदी क्षितिजाच्या वाटोळ्या धारेपर्यंत पर्वतांच्या रांगाच रांगा पसरल्या होत्या. पंड्या परत परत काहीतरी सांगत होता. माझे लक्षच नव्हते. शेवटी त्याने मला हालवले,
 "माताजी मनाची काय इच्छा आहे?"
 मला त्याच्या बोलण्याचा अर्थच समजेना. त्याने परत प्रश्न केला, "कोणता हेतू मनात धरून यात्रेला आलात?" हेतू? इच्छा? छे, काही नाही. माझे मन- मला निराळे असे मनच राहिले नव्हते. वरच्या निळ्या आकाशाला काही इच्छा होती का? काळे फत्तर काही हेतू मनात धरून का स्त्रवत होते ? त्या अफाट पसरलेल्या पर्वतांच्या रांगा कोठच्या कामनापूर्तीसाठी का थिजून उभ्या होत्या? मी त्यांच्यातलीच झाले होते. मीच ते निळे आकाश, ते कडे, ते डोंगर, ते अनंत अमर्याद चैतन्याने