हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १०९

 वेढा कमरेभोवती होता व बाकीची साडी सर्वांगभर सैल गुंडाळली होती. डोक्यावरून पदर खाली घेऊन परत खांद्यावरून मागे नेऊन पुढे आणला होता. आणि ह्या सर्वांतून मला बाईचं अंग सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत होतं. तिचा अर्धवट उघडा गळा. त्याखाली तिचे सुकलेले लोंबणारे स्तन दिसत होते. मागच्या बाजूनं तिची शरीर-रेषा तर फारच स्पष्ट दिसत होती. मानेपासून पाठ निघाली ते वाकण, कमरेशी मणक्याचं दुसरं वाकण, ढुंगणाचा फुगीर भाग, नंतर तो मांडीला मिळतो तिथली घडी, मांड्या, गुडघ्याच्या वाटीचा फुगवटा व त्या मागचा खोल भाग, खाली पोटरी व तीखाली घोटा व पाऊल. घोटा व पाऊल वस्त्राबाहेर होतं. म्हणून जास्त स्पष्ट दिसत होतं, असं मुळीच नव्हतं. वस्त्रातीलही अंग तितकंच स्पष्ट दिसत होतं. मधून-मधून वस्त्राच्या चुण्या, वस्त्र डोक्यावरून खांद्यावर आलं तिथली गोलाई, ब-याच ठिकाणी वस्त्र एकेरी, काही ठिकाणी दुहेरी, पण शरीर पूर्ण झाकील इतकी जाडी कुठेच नव्हती. तिचं काळं अंग, सुरकुतलेलं ढुंगण-अगदी रेष-नरेष दिसत होतं. बाई विनयशील होती. डोक्यापासून पोटर्‍याच्यापर्यंत वस्त्रात लपेटलेली होती. तिच्या प्रत्यंगांचं प्रदर्शन खट्याळ सूर्यकिरणं करीत होती. सूर्य कलाकार नव्हता म्हणून म्हणा, की सर्वश्रेष्ठ कलाकार होता म्हणून म्हणा, वस्त्राआडच्या तरुण नसलेल्या कृश, काळ्या देहाच उघडं पण झाकलेलं दर्शन मला तो घडवीत होता; आणि मला प्रत्यय आला की, आमचे जुने कलावंत कुठच्यातरी संकेताच्या आहारी जाऊन प्रतिमा घडवीत किंवा रंगवीत नव्हते, तर त्यांना जे दिसत होतं, ते थोड्याशा अतिशयोक्तीनं दाखवीत होते. आमचे मध्ययुगीन विणकरपण बारीक, तलम सुती वस्त्रं विणण्यात पटाईत होते. आणि वस्त्रांत गुरफटलेले पण उघडे असे स्त्री-पुरुष तेव्हापासून आजतागायत भारतात वावरत आहेत. मीच डोळे उघडे ठेवून बघत नव्हते.

 डोळे व कान उघडे ठेवून बघणं किंवा चित्त देऊन अनुभव घेणं म्हणजे तरी काय? मन निरनिराळ्या गमती करीत असतं. ज्या गोष्टीचा संबंध अगदी - वरवर पाहता दिसतो, तिथं तो संबंध उमजून येत नाही. असं एकदा नाही, तर अनेकदा घडतं. आणि मग एक दिवस अकस्मात उजाडतं. एकच गोष्ट उमगते असं नाही, तर आतापर्यंत लक्षात न आलेले धागेदारे व संबंध प्रत्ययाला येतात. पूर्वीच्या अनुभूतीत प्रत्ययाला न आलेल्या गोष्टी नव्या प्रेरणेनं मनात घुसतात. मनाला एवढा धक्का बसतो की, मन अगदी बधिर होऊन जातं.