हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ११९


 तास झाला. मुले पांगली. पण माझे विचार चालूच होते. गुन्हेगारांच्या प्रवृत्ती इतर मानवांसारख्याच असतात हे जर खरे, तर ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे कोणीही मनुष्य काही विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करणे शक्य आहे. लाखांमध्ये एखादा असा सापडतो की, तो 'प्राण गेला तरी बेहेत्तर, पण माझी स्वत:ची अशी मूल्ये बाळगून राहीन,' असे म्हणतो, आणि दहा लाखांत एखादाच असा की, कसोटीची वेळ आली, म्हणजे खरोखरच तसा वागतो. गुन्हेगारी, दुर्वर्तन, लबाडी हे सर्व प्रकार म्हणजे सर्वसाधारण मानवी प्रकृतीचाच आविष्कार मानिला, म्हणजे मानवी प्रकृती कुठल्या टोकापासून कुठल्या टोकापर्यंत जाण्याचा संभव आहे, ह्याची गुन्हेगारी ही एक खूण व आठवणच म्हणावयाची. गुन्हेगाराच्या रूपाने आपल्यापुढे जे येते, ते आपलेच सुप्त अनाविष्कृत स्वरूप का?

 माझे मन दचकून मागे सरले.

 जुना विषय संपून नवा सुरू झाला होता. सामाजिक संबंध किती प्रकारचे असतात, हे समजावून देणे चालले होते. फार खोल विचार न करता पाठ म्हणावा, तशी मी बोलत होते. “उच्चनीचपणा, पुढारीपणा, अनुयायीपणा परस्परसाहाय्य व विरोध-"

 "विरोध हाही एक सामाजिक संबंधच म्हणायचा का?" वर्गातून एक आवाज आला.

 "संबंध आल्याशिवाय विरोध येणारच नाही. एवढंच काय, जेथे-जेथे सहकार्य आहे तेथे-तेथे विरोध दिसून येतो. मालक व मजूर या दोघांच्या प्रयत्नांनी उत्पादन होत असते व त्याच क्रियेत दोघांचा एकमेकांशी विरोध दिसून येतो. समाजाच्या विधिनिषेधाच्या कल्पना आत्मसात करून व्यक्ती समाजाभिमुख होताना असा विरोध तर सारखा दिसून येतो. लहान मुलाचेच पहा. सकाळी दात घातल्याशिवाय खायचं नाही, ही सवय त्याला लावायला श्रम पडतात ना? त्यांचा विरोध होत-होत हळूहळू त्याच्या सामाजिक जाणिवेचा विकास होत असतो. समाजाची मूल्यं गळी उतरत असतात, आत्मसात होत असतात. ह्याहीपलीकडे जाऊन फ्रॉइड म्हणतो की, विरोध हा बर्‍याच प्रसंगी संमतीचं लक्षण असतो. मनातून संमती असते, बाहेरून विरोध असतो. जागृत मनाला म्हणजेच समाजाभिमुख मनाला अमक्या गोष्टी वाईट, अमक्या गोष्टी चांगल्या, अशी ठाम शिकवण मिळालेली असते. पण खोलखोल दुसरं मन दडलेलं असतं. लांडग्याचं क्रौर्य, वाघाचा शिकारीपणा,