हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १२१


झाला? पहिल्या महायुद्धानंतर युरोपात काही विशिष्ट घडी बसवण्याची विल्सन स्वप्ने रचीत होता, पण इंग्लंड-फ्रान्सच्या कुटिल राजकारणाचा वीट येऊन तो निघून गेला व जर्मनी या दुकलीच्या चिमट्यात गवसला. आपला प्रतिस्पर्धी, पहिले महायुद्ध करणारा गुन्हेगार, म्हणून जर्मनीच्या या दोन शत्रूनी पुरेपूरपणे जर्मनीचे नाक खाली करण्याचा चंग बांधला. जर्मनीच्या पुढाऱ्यांना त्या वेळच्या राष्ट्रसंघात न्याय मिळणे अशक्य झाले. तिच्या साध्या व रास्त मागण्याही धुडकाविल्या गेल्या. मी जर्मनीत गेले, तेव्हा ते सबंध राष्ट्र रागाने धुमसत होते. जे याचनेने मिळाले नाही, ते हिटलरने दांडगाईने घेतले, तेव्हा जर्मनीवर एकच आवाज उमटला, “असेच पाहिजे होते. इंग्लंडला, फ्रान्सला व अमेरिकेलाही सभ्य, रास्त मागण्या समजत नाहीत; त्यांना बडगाच कळतो." पहिली दांडगाई पचल्यावर हिटलरने निरपराध राष्ट्रांना गिळंकृत केले; ती दांडगाई ह्या बड्यांनी ऐकून घेतली. त्या वेळी दटावले असते. परिणामाचा भयंकर परिपाक लक्षात घेऊन वेळीच ठोकले असते, तरी जर्मनी गप्प बसता. पण पहिल्याने स्वार्थामुळे डोळ्यांवर पडदा ओढला. आता भीतीने गप्प बसले. ह्या भानगडीत मध्ययुरोपातील फिनलंडपासून अल्बानियापर्यंत सर्व चिमुकल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य पहिल्याने जर्मनीने व नंतर रशियाने नष्ट केले व लक्षावधी असहाय ज्यूंची अमानुष हत्या झाली. ह्याला जबाबदार फक्त जर्मनीच का? जर्मनीच्या गुन्हेगारीत सर्व युरोपचा, पर्यायाने सर्व जगाचा वाटा नाही का? जी गोष्ट राजकीय गुन्हेगारीची, तीच, सामाजिक गुन्हेगारीची.

 एका भयंकर सत्याच्या जाणिवेने मी व्याकुळ झाले होते. 'तत्त्वमसि', "ते तू आहेस'- माझ्यापढे बोट नाचवीत मन म्हणत होते. मी थरथर कापत म्हटले, "होय, हे मीच आहे. आइश्मान, स्टालिन, हिटलर आणि त्यांनी मारिलेले लोकसद्धा मीच आहे."

 पण एवढ्यावरच हा ज्ञानाचा लोट थांबणार नव्हता. "इतर देशांतल्या माणसांची व घटनांची नावे का घेतेस? घरचीच, जवळचीच नावे घे की." मनाने छेडले.

 "स्वातंत्र्याच्या चळवळीत काही निरपराध माणसं मारिली गेली. काय म्हणालीस तु त्या वेळेला? आठवतं?"

 मला आठवलं, “देश युद्धात पेटलं, म्हणजे असं एखादे वेळेला व्हायचंच."