हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १२९

नाही', म्हणताना त्या स्वत:च्या जीवनातील श्रद्धास्थानांबद्दल, स्वत:ला जाणवलेल्या त्यांच्या अस्तित्त्वाबद्दल सांगण्याच धडपड करतात. हे सांगताना त्यांचे मन या देहाला गाव समजून त्यातल्या देवळाबद्दलही सांगू लागते. म्हणजे यावेळी बाई कसल्यातरी शोधात असाव्यात. परत-परत कशाचेतरी चिंतन आणि कसलीतरी खळबळ त्यांच्या अंतर्मनात चालू असावी, आणि विशेष म्हणजे ती स्वत:ची अनुभूती शोधण्याची होती. त्या खळबळीचा व्यावहारिक जीवनाशी काही संबंध नव्हता.
 ‘दुसरे मामंजी’, ‘आई सापडली' हे निबंध थोडेसे आत्मचरित्रात्मक तर थोडेसे चिंतनशील अंतर्मनाचे स्वरूप व्यक्त करणारे आहेत. स्वत:संबंधीचे विचार चालू असताना, स्वत:चे कठोर आत्मपरीक्षण करीत असताना त्यांचे समाजाचे चिंतन सुटले नव्हते.
 'व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता नव्हे', पुनर्जन्माचा बिनतोड पुरावा' हे मध्येच आलेले लेख त्याची प्रचीती देतात. त्याबद्दल विशेष काही सांगण्याची जरूरी नाही. परंतु 'एकाकी', 'किंकाळी', 'आत्मचरित्र लिहिण्यामागील माणसाचे मन', 'उकल', आणि' हे सर्व तूच आहेस!' या लेखांमागे मात्र एक विशिष्ट सूत्र असून बाई स्वत:ची अनुभूती ज्या पद्धतीने संगत आहेत तीत स्वत:बद्दल सांगताना स्वत:च्या भावविश्वाबद्दल, स्वत:च स्वत:शी करीत असलेल्या झगड्याबद्दल खूपसे काही सांगून जातात, आणि ती त्याची अनुभूती दुस-याला चिंतनप्रवण करणारी आहे, असे मला तीव्रतेने जाणवते.
 भोवरा' मधील, 'भटके' लिहिताना बाई स्वत:च्या एकटेपणाला, आजारीपणाला, मृत्यूला भीत होत्या. 'भटके'मध्ये त्यांची कुणा-ना- कुणाबद्दल तक्रार आहे; कुणा-ना-कुणाकडून काही अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा, एकाकीपणाची ही भीती ‘एकाकी'मध्ये नाहीशी झाल्यासारखी वाटते.
 'एकाकी'पासून पुढचे निबंध वाचू लागलो की, बाईंबरोबर आपणही मनाच्या एका निराळ्याच पातळीवर जातो.
 या मधल्या काळात बाई आत्मरत व अंतर्मुख होत होत्या. आर्त, भयभीत होऊन पंढरपूरच्या विठोबाला मिठी मारीत होत्या. आपल्याला झालेल्या आजारामुळे मृत्युने पाठ धरली आहे, याची तीव्र जाणीव त्यांना झाली होती; आसपासच्या सर्वांना ती झाली होती.