हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १४७


त्यांना जाणवलीच नाही हे खरे, की ही विसंगती जाणवूनसुद्धा त्यांनी ती जतन केली हे खरे, याविषयी नक्की निवाडा कुणाला देता येईल, असे वाटत नाही. एका सुसंस्कृत अशा उदारमतवादी वातावरणात इरावतीबाई वाढल्या. या उदारमतवादी भूमिकेविषयीचा त्यांचा जिव्हाळा कधी आटला नाही. हिंदुस्थानातील नेमस्त, मवाळ पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून समाप्त झाला, त्या वेळी इरावतीबाई हळहळल्या. पण हे हळहळणे त्या वेळेपुरतेच नव्हते. पुढे रँग्लर परांजप्यांच्याविषयी लिहिताना हा उदारमतवादाविषयीचा जिव्हाळा पुन्हा एकदा उसळून आलेला आहे. उदारमतवादाविषयी जिव्हाळा असणाऱ्या विदुषीला बेंथमविषयी मात्र फारशी आपुलकी वाटत असलेली दिसत नाही. सदगुणांच्यासाठी सदगुण ही भूमिका मूर्खपणाची आहे. जे परिणामी चांगले, जे बहुतेकांच्या व बहुसंख्येच्या बहुत हिताचे ते चांगले, असे मानणारा जेरमी बेंथेम हा मात्र बाईंना कालिदासाने रंगविलेल्या सिंहाचा नवा अवतार वाटला. अर्थशास्त्रात अ‍ॅडम स्मिथ आणि रिकार्डो व काही प्रमाणात बेंथम, समाजचिंतनात मिल, स्पेन्सर आणि बेंथम ही इंग्लंडच्या उदारमतवादाची दैवते होती.

 उदारमतवाद हे मुळातच आशिया-आफ्रिकेच्या शोषणावर पुष्ट झालेल्या समृद्ध अशा व्यापारी संस्कृतीचे तत्वज्ञान होते. त्या उदारमत- वादाचा जिव्हाळा बाई कधी टाळू शकल्या नाहीत; आणि हिंदुस्थानभर पसरलेले अफाट दारिद्य आणि दु:ख यांविषयीची कणव त्या कधी टाळू शकल्या नाहीत. उदारमतवाद ज्या निरनिराळ्या योजना आखीत होता, त्या योजनात बाईंना रस नव्हता. स्त्री शिकली म्हणजे सुसंस्कृत होते, स्त्रियांच्या शिक्षणाने त्यांची दु:खे कमी होतील, घटस्फोटाची सोय व्यक्तिस्वातंत्र्य वाढवून व्यक्तीला अधिक सुखी करील, अशा प्रकारच्या कोणत्याच भोळ्या वादावर बाईंचा विश्वास नव्हता. सुधारणावादी कार्यक्रम सुख वाढविणारा आहे, हेही त्यांना पटत नव्हते. अफाट भारतीय दारिद्यावर उदारमतवाद हा तोडगा आहे, यावर त्यांचा विश्वास नव्हता. उदारमतवाद प्रत्येक वेगळेपणाची जपणूक करितो; इतस्ततः आंढळणारा वेगळेपणा उदारमतवादाला व्यक्तिस्वातंत्र्याची आवश्यक अट वाटते. या अलगीकरण आणि विभक्तीकरण टिकविणाऱ्या कार्यक्रमावर त्यांचा विश्वास नव्हता.

 वेगवेगळी मते टिकावी. व्यक्तिस्वातंत्र्य असावे, असे त्यांना वाटे. पण आदिवासी समूहांच्या भिन्न-भिन्न संस्कृतींची जपणूक करण्याच्या प्रयत्नात