हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५४ । गंगाजल

स्वीकार करण्याचीही त्यांची पद्धत आहे. कुणीतरी एक पूईगंधा सतत पुरुष सहवासासाठी तळमळत वारली. मरताना तिच्या डोळ्यांसमोर एका रूपवती वेश्येच्या भोवती घोटाळणारे पाच तरुण होते. 'हे ईश्वरा! तिला पाच जण मिळावेत, आणि मला एकही मिळू नये काय?' हा विचार करिताना पूईगंधेचा प्राण गेला. ती पुढच्या जन्मी द्रौपदी झाली. तिला पाच नवरे प्राप्त झाले. ही जैन वाङमयातील माहिती बाईंनी पूरक म्हणून वापरलेली आहे. अशी जैन माहिती पुन्हा द्वारकेच्या संदर्भातही त्यांनी वापरलेली आहे. ही द्वारका कवींना भगवंतांच्या वैभवाचे प्रतीक वाटली; बाईंना द्वारका कृष्णाच्या कायम पराजयाचे स्मृतिचिन्ह वाटते.

 यामध्ये महाभारताचे जे सततचे चिंतन चालू आहे, जी विविध स्पष्टीकरणे चालू आहेत, त्यांपेक्षाही बाई सतत महाभारताच्या सहवासात जगत आहेत, ही गोष्ट मला महत्वाची वाटते. न संपणाऱ्या सततच्या सज्जनपणाची प्रतिनिधिभूत पात्रे, न संपणाऱ्या द्वेषाची कहाणी, मनात जळत असणारी दुःखे सतत जपणारे सज्जन, भीष्माच्या रूपाने पापाच्या संरक्षणार्थ उभे असणारे पुण्य आणि पुण्याच्या समर्थनार्थ दर क्षणी कोणतेही पाप करण्यास उद्युक्त होणारा कृष्ण ही गुंतागुंतीची, मनस्वी व्यक्तींची कहाणी ज्यात आहे, तो ग्रंथ बाईंच्या सहवासात निरनिराळे अर्थ दाखवू लागतो. पण महाभारतात शेवटी सारेच व्यर्थ झालेले आहे. जयही पराजयाइतकाच कटू झाला आहे. कर्ते आणि नाकर्ते सर्वांनाच एका विशाल शून्यामध्ये महाभारताने बुडवून टाकिले आहे. सगळे कर्म करीत असताना दर टप्प्यावर 'याचा अर्थ काय?' 'त्याचा अर्थ काय?' असे विचारीत सगळेच निरर्थक ठरविणारा आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन मात्र सार्थ करणारा महाभारतासारखा ग्रंथ बाईंचा अखंड सहचर आहे. या आधारामुळेच बाईंचा प्रवास चालू असताना त्या थकत नाहीत; त्यांचे प्रश्न संपत नाहीत; आणि कोणतेही दुःख त्यांच्या मनाला खच्ची करू शकत नाही.

 या पार्श्वभूमीवर बाईंच्या दोन व्यक्तिरेखा पाहिल्या पाहिजेत. त्यातली एक त्यांच्याच सासऱ्यांची, म्हणजे महर्षी कर्व्यांची होती. जीवनातल्या नायकांच्या विषयी आपल्या समजुतीही स्वप्नरंजनातच रमलेल्या अशा आहेत. या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने एका नायकाच्या नायकत्वाची मीमांसाच जणू इरावती करीत आहेत, असे वाटू लागते. ज्याचे सार्वजनिक जीवन सर्व समाजासाठी आहे, तो माणूस घरालाच पारखा होऊन जातो. माया आणि