हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / २१

दृष्टीतून निसटत नसे. मी चुकीची उत्तरे दिली की, ते मला समजावून सांगायचा प्रयत्न करीत. पण मी इतकी भेदरलेली असे की, ते काय सांगतात, हे मला ऐकूच यायचे नाही. संध्याकाळी ते क्लबातून घरी यायच्या आत दोन घास खाऊन मी बिछान्यावर झोपेचे सोंग घेऊन पडत असे. पण ही युक्ती नेहमीच जमायची नाही. त्यांची भीती वाटायचे आणखी एक कारण म्हणजे घरातल्या मुलांना ते आळीपाळीने इंग्रजी वाचायला सांगत. ते आरशापुढे दाढी करायचे व बहुतकरून शकू व कधीमधी दुसरे कोणीतरी उभे राहून पुस्तक वाचायचे. वाचताना चूक झाली की, ते जोराने खेकसायचे व चूक सुधारून द्यायचे. मला आठवते आहे की, एकदा साळूताई (अप्पांच्या घरी असलेली आणखी एक मुलगी) त्यांच्याजवळ वाचीत असताना एका इंग्रजी शब्दाचा उच्चार करायला चुकत होती; ते परत-परत तिला बरोबर उच्चार करून दाखवीत होते व तिला ते काही कळत नव्हते. शेवटी ती बिचारी घेरी येऊन पडली. हा प्रकार पाहिल्यावर तर अप्पांच्या दाढीच्या वेळेला लांबूनसुद्धा त्यांच्या दृष्टीस न पडण्याची खबरदारी मी घेऊ लागले. तिसरे कारण म्हणजे अप्पांचा निरीश्वरवाद. संधी मिळेल तेव्हा देवपूजा व व्रतवैकल्ये ह्यांची ते चेष्टा करीत असत. कुठे मला लागले, किंवा परीक्षेत नापास झाले, तरी मला म्हणत, “आता कुठे गेला होता तुझा देव? कर की त्याला नवस! त्यांच्या चेष्टेला मला उत्तर देता येत नसे, पण मनाला वाईट वाटे, व त्यामुळेही मी होता... होईतो त्यांच्यापासून लांब राही.

 अप्पांचे घर म्हणजे सुखवस्तू, आतिथ्यशील गृहस्थाचे घर होते.घरी गडी मनुष्य, म्हशी, घोडागाडी वगैरे होते. पण माझ्या आठवणीत, ते मिनिस्टर होईपर्यंत स्वयंपाकी नव्हता, वहिनी, साळूताई व आम्ही मुली अशा स्वयंपाकघरातली कामे करीत असू. अगदी लहानपणी भाज्या, कोशिंबिरी, जरा मोठी झाल्यावर भात, भाकरी, पोळी वगैरे जिन्नस करायला शकूच्याबरोबर मीही शिकले. निवडणे-टिपणेही सगळ्यांकडून-मुलगे व मुली मिळून होत असे. डाळ-तांदूळ, गहू-जोंधळा सर्व जिनसा सगळ्यांना वाटे घालून सारख्या निवडायला देत असत. असडी तांदूळ कांडायलाही मी त्यांच्याकडेच शिकले. शकू व सईताईही कांडप करीत. खाणे, पिणे, काम करणे, कुठच्याही बाबतीत आपली मुलगी व इतर असा भेद त्या घरात झाला नाही. फरक काय तो माझ्या आठवणीत एका बाबतीत होई. तो म्हणजे शकू आमच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मार मात्र खात असे. तिने परवा नुकतीच