हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ५८ / गंगाजल







आजच कां बरं ही सर्वजणं आठवलीं?
माझ्या हाकेला ओ देऊन आली देखील?
पण निघून गेली,
बोलली नाहींत.
तोंड लपवून, टेापी घालून
मी मलाच कां दडवीत होते?
माझ्या दु:खाने शेवटीं मला दुखावलेंच
सर्व नाटक
सर्व स्वप्नांतला खेळ
पण नीटसा साधला नाहीच.

अरे, वाढलंस का?
उशीर होतो आहे,
कामाचा ढीग पडला आहे.
आलें एकदाची वेळेवर
आहांत का सगळे?
दोघेदोघेजण या,
काम समजावून सांगते
आज जायच्या आधी अर्धं झालं पाहिजे.
एक समाधानाचा सुस्कारा
एक अभिमानाचं हसू