हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ६४ / गंगाजल

कुरूप, इष्ट-अनिष्ट हे गुण वस्तूंना आपण सारा वेळ चिकटवीत असतो. ते वस्तूंत नसून व्यक्तींच्या मनाचेच असतात. आणि व्यक्तीचे मन बहुतेक अंशी समाजाने घडविलेले असते.

 ह्या गोष्टींना ‘गुण' याऐवजी 'मूल्य' हा शब्द बरोबर ठरेल. प्रत्येक व्यक्ती सारा वेळ मूल्यांच्या जगात वावरत असते. ही मूल्ये व्यक्तिनिष्ठ किंवा समाजनिष्ठ आहेत, म्हणून ती खरी मूल्येच नव्हेत, किंवा ती मुळी खरोखरीची अस्तित्वातच नाहीत, हे म्हणणे अतिशय चूक आहे. बाहेरील जगात असलेल्या वस्तूंच्या गुणधर्मावर मनुष्याचे व्यवहार ज्याप्रमाणे आधारलेले असतात, त्याप्रमाणे सामाजिक मूल्येही मानवी व्यवहाराला जरूर आहेत. ती असल्याशिवाय समाज राहू शकत नाही आणि समाजाशिवाय व्यक्ती ही कल्पनासुद्धा अशक्य कोटीतील आहे. अगदी साध्यासाध्या व्यवहारातसुद्धा समाजाचे अलिखित नियम मनुष्य पाळीत असतो. जीवनोपयोगी वस्तूंची देवाणघेवाण, एकत्र राहणे, शेजारी-शेजारी राहणे, खेळणे, कुटुंब या नावाखाली येणारे अनंत व गुंतागुंतीचे व्यवहार करणे, यांशिवाय राजसंस्था, शासनसंस्था, धर्मसंस्था ह्यांच्यात भागीदार असल्यामुळे करावे लागणारे व्यवहार ह्या सर्वांनाच बंधने व नियम लागू आहेत. ह्या बंधनांमुळे आणि नियमांमुळे काही तऱ्हेचे व्यवहार योग्य समजले जातात व काही अयोग्य समजले जातात. योग्य असलेल्या व्यवहारांची यादी फार करून आढळत नाही. पण अयोग्य व्यवहारांची यादी बहुतेक साक्षर समाजांतून कायद्याच्या नावाखाली केलेली आढळते. अयोग्य व्यवहार कायद्याच्या कक्षेत झाल्यास त्याबद्दल शासन काय असावे, हेही बहुतेक साक्षर समाजांत नमूद केलेले असते. पण कायद्यात न सांगितलेले किंवा ज्यांच्याबद्दल शासन स्पष्ट तर्‍हेने दिलेले नाही, असेही अयोग्य व्यवहार पुष्कळच असतात व त्याबद्दल समाज किंवा त्याचा काही भाग आपली नापसंती निरनिराळ्या तर्‍हांंनी व्यक्त करीत असतो.

 व्यवहारातील योग्यायोग्यता ही जीवनातील काही विशिष्ट महत्वाच्या विभागालाच लागू आहे, असे नाही. अगदी क्षुल्लक बाबतीतसुद्धा वागण्याच्या मर्यादा असतात. किती खावे, किती वेळा खावे, काय ल्यावे कसे ल्यावे, काय बोलावे, कसे बोलावे, चालणे कसे असावे, दृष्टी कशी असावी, येथपासून तो लग्नाच्या बायका किती असाव्या, लग्नाबाहेरचे संबंध असावे किंवा नसावे, असल्यास कुठच्या प्रमाणात, सुंदर बायकोच्या