हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजळ / ६७

आवश्यक आहे. वाङमयाच्या इतर कार्याबरोबरच एक महत्त्वाचे कार्य म्हणजे जे साधारणपणे मिळत नाही, ते मिळाल्याचा भास उत्पन्न करणे. "बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊनिया तृप्त होई कोण?" असे जरी तुकारामबोवा म्हणाले तरी थोड्याबहुत प्रमाणात तेच कार्य वाङमय, कला आणि धर्म करीत असतात. त्याशिवाय भिका-याला राजपद मिळाल्याच्या गोष्टी सर्व जगातील वाङमयातून दिसल्याच नसत्या. जातिनिष्ठ समाजामध्ये चोखामेळ्यासारख्याला प्रत्यक्ष लाथाच बसतात. पण धर्माने त्याला मरणानंतर संतपद दिले व वैकुंठाची प्राप्ती करून दिली. बायबलमध्ये बरोबर असेच सांगितले आहे की, देवाच्या राज्यात पृथ्वीवरील उपेक्षितांना खास जागा राखून ठेविलेली असते. प्रत्येक कादंबरी, कथा किंवा काव्य हे वाचताना साधारण मनुष्य त्यांतील कलामूल्यांचा विचार करीत नाही. वाचक त्या वेळेपुरते स्वत:ला त्या-त्या प्रसंगातील नायक किंवा नायिका करतो. जितका कलेचा दर्जा खालचा तितक्या प्रमाणात अशा त-हेने स्वत:चे समाधान करणे जास्त सोपे जाते. विशेष म्हणजे हे समाधान, हे सौख्य वीट येणारे नसते. इतकेच काय, अशा त-हेचे सौख्य लाभायला व कंटाळा टाकावयाला उपाय म्हणून कलाकृती जास्त-जास्त भडक व्हावी लागते. मनुष्य खाऊन-खाऊन तात्पुरता का हाईना, तृप्त होतो. कामेच्छा कितीही प्रबळ असली, तरी तृप्तीचा क्षण प्रत्यक्ष कामपूर्तीनंतरच येतो. कितीही ताकदवान असला तरी स्वतः खेळत असताना मनुष्य दमतोच. पण चविष्ट जेवणाची वर्णने वाचून किंवा शृंगाराची वर्णने वाचून किंवा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून सौख्य झाले, तरी तृप्ती मिळत नाही. आणि ब्रेबर्न स्टेडियमवर खेळणार्‍याने कितीही श्रमाने धावा काढिल्या, तरी पाहणा-याचे पाय दुखत नाहीत. ह्यासाठी शृंगार जास्त-जास्त भडक करण्याकडे वाङमय किंवा चित्रपट याची प्रवृत्ती होऊ लागते. कलेचे सर्वच क्षेत्र वासनेचा सौदा करावयालाही फार सोयीचे ठरते.

 योग्यायोग्यतेचे नियम कलेला लागू झाले, तर कलावंताच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कलेत प्रकट होणा-या सर्जनशक्तीला बाध येतो, असे काहींचे म्हणणे आहे. आणि खरोखरच अश्लील काय व काय नाही, हे ठरविण्याची अडचण खरी हीच आहे. कलावंत-मग तो लेखक, चित्रकार, शिल्पी किंवा चित्रपटनिर्माता-कोणीही असो, नवनिर्मिती करण्याचे त्याचे